नांदेड : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे नांदेडच्या मतदारांनी (स्व.) खा. वसंतराव चव्हाण यांना भरघोस मतांनी विजयी केले. त्याचप्रमाणे या पोटनिवडणुकीतही त्यांचे सुपुत्र महाविकास आघाडीचे लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण यांनाच विजयी करतील, तसेच विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
काँग्रेस पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीच्या प्रचाराने वेग घेतला असून, सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आघाडीत बिघाडी असल्याची विरोधकांकडून निव्वळ अफवा पसरविली जात आहे. आघाडीमध्ये कुठलीही बिघाडी नाही. या निवडणुकीत महाविकास आघाडीलाच स्पष्ट बहुमत मिळेल. नांदेड उत्तरसह दोन-चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. परंतु नांदेड उत्तर मतदारसंघातून अब्दुल सत्तार विजयी होतील, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत भाजपला हादरा बसल्याने त्यांनी योजना सुरू केल्या, लाडक्या बहिणीला लाभ दिला म्हणजे, त्या गुलाम आहेत का? असा सवालही थोरात यांनी उपस्थित केला.
राहुल गांधींची उद्या नांदेडात सभा
नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची येत्या १४ तारखेला नांदेड येथे जाहीर सभा होणार आहे. शहरातील नवा मोंढा येथील कृषी बाजार समितीच्या मैदानावर दुपारी २ वाजता ही सभा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे लोकसभा समन्वयक श्याम दरक यांनी यावेळी दिली.