लासलगाव : केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला कांदा ग्राहकांना २४ रुपये प्रति किलो दराने दिलासा देण्यासाठी थेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लासलगावहून तब्बल ८४० मेट्रिक टन कांद्याचे २१ डब्यांचे रेक रेल्वेने रात्री उशिरा कोलकात्याकडे रवाना करण्यात आले. कोलकात्यात या कांद्याची विक्री होणार असून स्थानिक शेतकऱ्यांवर त्याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लासलगाव बाजार समितीत आज कांद्याचे दर अचानक २०० रुपयांनी घसरून सरासरी दर १०००–१२०० रुपये क्विंटलवर आले. तर येवला बाजार समितीत दर फक्त ८५१ रुपये क्विंटल पर्यंत पोहोचला. यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, केंद्रीय व राज्य मंत्र्यांना कांद्याची व्यथा मांडण्यासाठी फोन आंदोलन सुरू केले आहे. संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी पुढील टप्प्यात मुंबई आणि दिल्ली येथील मंत्रालयासमोर तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना फोनवर व्यथा मांडण्यात आली असून, तातडीने दखल न घेतल्यास पुढील टप्प्यात मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल.भारत दिघोळे, अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असून १०-१५ रुपये प्रति किलो तोट्यात कांदा विक्री करावा लागत आहे. त्यातच केंद्र सरकारने खरेदी केलेला कांदा बाजारात आणल्यामुळे स्थानिक दर अधिक खाली आला असून उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ग्राहकांना दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कांदा दरातील घसरणमुळे पुन्हा शेतकरी-सरकार संघर्ष पेटण्याची शक्यता दिसत आहे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांवर त्याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.