नागपुरात मैत्रीला काळीमा! ३ हजारांच्या उधारीपायी मित्रालाच संपवलं, दोघे अटकेत 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

नागपुरात मैत्रीला काळीमा! ३ हजारांच्या उधारीपायी मित्रालाच संपवलं, दोघे अटकेत

नागपुरात ३ हजार रुपयांच्या उधारीच्या वादातून २५ वर्षीय तरुणाची मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Mayuri Gawade

नागपूर : फ्रेंडशिप डे नुकताच साजरा झाला. सोशल मीडियावर मैत्रीच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच नागपुरातून मैत्रीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ ३ हजार रुपयांची उधारी परत न केल्याच्या कारणावरून मित्राची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा ठोस पुरावे नसतानाही तांत्रिक तपासाच्या आधारे या 'ब्लाइंड मर्डर' प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी (दि.०२) दिली.

जंगलात आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मृत तरुणाची ओळख अतुल चंद्रकांत तिवारी (२५) अशी झाली आहे. तो हिंगणा रोड परिसरातील भीमनगर येथे राहत होता. २० जुलै रोजी कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांगली गावाजवळील जंगल परिसरात विहिरीजवळ त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता.

शवविच्छेदन अहवालातून हत्येचा उलगडा

सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले होते. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने मृताची ओळख पटवण्यात आली. तसेच २२ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास

या प्रकरणाचा तपास पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरला. घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता आणि घटनास्थळावरूनही ठोस पुरावे मिळाले नव्हते. स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला.

३ हजार रुपयांवरून झाला वाद

तपासादरम्यान पोलिसांनी योगेश पोपलघाट (२८) आणि मनोज नारनवरे (२८) यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी अतुलला ३ हजार रुपये उसने दिले होते, अशी माहिती समोर आली. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार मागणी करूनही अतुलने पैसे परत केले नव्हते. याच कारणावरून १७ जुलै रोजी त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दोन्ही आरोपी अटकेत

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, हत्येमागील इतर कारणांचाही तपास सुरू आहे. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी होते का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai Ganesh Aagman 2026 : बाप्पाच्या आगमनाला सुरुवात! लालबाग-परळमध्ये जल्लोष; अनेक मूर्ती गुजरातकडे रवाना, VIDEO

आयटीमध्ये आता नवीन रोजगार नाही; AI आणि डेटा सेंटर उभारणीसाठी गुंतवणूक होत आहे - श्रीधर वेम्बू

CSMT वर स्मार्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली; गाडीची अद्ययावत माहिती एका नजरेत उपलब्ध

'लायन'ची सहा दशकांनी भारतात वापसी; प्रीमियम बिअरसह ब्रिटिश बीअर उत्पादकाचा दिल्लीच्या बाजारात प्रवेश