छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित करणारी धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका ३५ वर्षीय विवाहितेचे अपहरण करून तिला तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी राजू माळी याला नेवासा परिसरातून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित महिला आणि तिचा पती बदनापूर तालुक्यातील रहिवासी असून दोघेही ऊसतोडीचे काम करतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने महिलेला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला. पीडिता आणि तिचा पती ऊसतोडीच्या कामासाठी गंगापूर येथे गेले असताना आरोपीही तेथे पोहोचला होता. या काळात त्यांच्यातील संपर्क वाढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
चॅट आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी
१४ जुलै रोजी पीडिता आपल्या बहिणीसोबत आणि मावसभावाला भेटण्यासाठी घाटी रुग्णालयात आली होती. दुपारी बहीण घरी गेल्यानंतर ती रुग्णालयात थांबली होती. त्यावेळी आरोपी तिला भेटण्यासाठी तेथे आला.
पीडिता पाणी आणण्यासाठी खाली गेली असता आरोपीने तिला अडवले. आपल्यासोबत आली नाहीस तर चॅट आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन, अशी धमकी त्याने दिल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या महिलेने त्याच्या दुचाकीवर बसण्यास होकार दिला. त्यानंतर आरोपीने तिचा मोबाईल काढून घेतला आणि तिला शहरापासून दूर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये नेले.
२४ तासांहून अधिक काळ डांबले
आरोपीने पीडितेला शेडमध्ये डांबून ठेवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर १६ जुलै रोजी आरोपीने तिला नेवासा परिसरातील दुसऱ्या शेडमध्ये नेले. तेथेही दिवसभर ओलीस ठेवून अत्याचार केल्याचा आरोप आहे.
१७ जुलै रोजी पीडितेने मुलांची आठवण येत असल्याचे सांगत आपल्याला घरी सोडण्याची विनंती केली. त्यानंतर आरोपीने तिला नेवासा येथून बसमध्ये बसवून गावी पाठवले. मात्र, पोलिसांकडे तक्रार केल्यास किंवा पुन्हा भेटण्यास नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचेही पीडितेने सांगितले.
पतीला सांगितला संपूर्ण प्रकार
गावी परतल्यानंतर पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला आणि त्याला नेवासा परिसरातून अटक केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.