नागपूर : भाजपने नागपूर महानगरपालिकेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज मंगळवारपासून नागपूर महानगरपालिकेत संपूर्णतः खरेखुरे ‘महिला राज’ अवतरले आहे. राज्यातच नव्हे तर देशातही अशाप्रकारे सर्व प्रमुख पदांची सूत्रे महिलांकडे सोपवण्याची ही पहिलीच वेळ असावी, अशी चर्चा आहे. सध्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘मातृशक्तीचा सन्मान’ या भावनेतून भाजपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या ऐतिहासिक निवडीनंतर महापौर नीता ठाकरे आणि नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच शहराच्या विकासासाठी आता महिलांची ही टीम सज्ज झाली आहे.
राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर सर्व शहरात महापौरांची निवड प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सर्वत्र विविध समितींच्या सभापतींच्या नावांची घोषणा होताना दिसत आहे. नागपूर महापालिकेत मंगळवारी एक विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये महापौर आणि उपमहापौरपदांनंतर आता स्थायी समिती, परिवहन, आरोग्य आणि शिक्षण अशा सर्वच महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षांच्या नावांचा समावेश होता. नागपूर पालिकेतील या सर्व समित्यांवर महिला नगरसेविकांची निवड करण्यात आली आहे.
भाजपचा नवा पायंडा
दरम्यान, नागपूर महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे राजकारणातील महिलांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच भाजपने नागपूर पालिकेच्या चाव्या महिलांच्या हाती सोपवून एक नवा पायंडा पाडला आहे. या ऐतिहासिक बदलामुळे नागपूरच्या नागरी समस्या सोडवण्यात आणि विकास प्रकल्पांना गती देण्यात महिला शक्ती यशस्वी ठरणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
स्पष्ट बहुमत असल्यामुळेच झाले शक्य
नागपूर महानगरपालिकेच्या एकूण १५१ जागांपैकी भारतीय जनता पक्षाकडे १०८ नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत आहे. यामुळेच सर्व महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती करणे पक्षाला सहज शक्य झाले आहे. तर प्रमुख
विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे २९ जागा आहेत. तसेच बहुजन समाज पक्षाचे १०, शिवसेनेचे २, राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि १ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे.
नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांची यादी
महापौर - नीता ठाकरे
उपमहापौर - लीला हात्तीबेड
स्थायी समिती - शिवानी दाणी
परिवहन समिती - मंगला खेकरे
स्थापत्य समिती - अश्विनी जिचकार
अग्निशमन - मायाताई इवनाते
आरोग्य - मनीषा अतकरे
विधी - निधी तेलगोटे
शिक्षण - संतोषदेवी लड्डा
गलिच्छ वस्ती निर्मूलन - ऋतिक मसराम
क्रीडा - दर्शनी धवड
महिला व बालकल्याण - सारिखा नांदुरकर
जलप्रदाय - दिव्या धूरडे
कर आकारणी - सरिता कावरे