नागपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचे कोठडीतही चोचले; नाश्त्याला पिझ्झा, झोपायला मऊ बिछान्याची मागणी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

नागपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचे कोठडीतही चोचले; नाश्त्याला पिझ्झा, झोपायला मऊ बिछान्याची मागणी

नागपुरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी निर्मय पाखरेने पोलीस कोठडीत पिझ्झा, मऊ बिछाना आणि चांगल्या जेवणाची मागणी केली आहे. मोबाईलचे पासवर्ड देण्यासही त्याने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

Mayuri Gawade

नागपूर : इंस्टाग्रामवर बनावट ओळख निर्माण करून १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा, तिचे खासगी फोटो मिळवून ब्लॅकमेल केल्याचा आणि भाड्याच्या खोलीत डांबून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या ठाण्यातील तरुणाने आता पोलीस कोठडीत पिझ्झा, मऊ बिछाना आणि उत्तम जेवणाची मागणी केल्याने पोलिसही चक्रावले आहेत. आरोपीने कोठडीतील भिंती आणि शौचालय अस्वच्छ असल्याची तक्रार करत डासांपासून बचावासाठी औषधही मागितल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही, तर तपासासाठी महत्त्वाचे असलेल्या स्वतःच्या आणि पीडित मुलीच्या मोबाईलचे पासवर्ड देण्यासही त्याने नकार दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

कोठडीतील सुविधांबाबत आरोपीच्या मागण्या

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अटकेनंतर आरोपीने पोलीस कोठडीतील परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. कोठडीच्या भिंती घाणेरड्या असून शौचालय अस्वच्छ असल्याची तक्रार त्याने केली. तसेच त्याने नाश्त्यासाठी पिझ्झा, चांगल्या दर्जाचं जेवण, झोपण्यासाठी मऊ बिछाना आणि डासांपासून बचावासाठी रिपेलंट देण्याची मागणी केल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुरुवातीला त्याने वैद्यकीय तपासणी करून घेण्यासही नकार दिला होता. मात्र, नंतर त्याला तपासणीसाठी नेण्यात आलं.

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर सुरू झाला शोध

रविवारी ( दि.२) संबंधित मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने आणि तिचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीचे इंस्टाग्राम चॅट, मोबाईलशी संबंधित तांत्रिक माहिती आणि इतर डिजिटल पुरावे तपासले. त्यातून 'आकाश मेहरा' या बनावट नावाने तिच्याशी संवाद साधणाऱ्या तरुणाची खरी ओळख पटली.

आईच्या फोनमुळे मिळालं आरोपीचं लोकेशन

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, आरोपी ठाण्यातील असल्याचं समजल्यानंतर नागपूर पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या मदतीने त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्याच्या आईला आरोपीला फोन करण्यास सांगण्यात आलं. आरोपीने फोन उचलताच सायबर पथकाने त्याचं लोकेशन नागपुरातील दिघोरी परिसरात असल्याचं शोधून काढलं. दरम्यान, त्याने पीडित मुलीला फोन करून आपण सुरक्षित असल्याचं कुटुंबीयांना सांगण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. या फोनमुळेही पोलिसांना त्याच्या ठिकाणाबाबत महत्त्वाचा धागा मिळाला.

फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्याच्या मागोमाग पोहोचले पोलीस

तपासादरम्यान त्याच परिसरातील एका पत्त्यावर ऑनलाइन खाद्यपदार्थांची डिलिव्हरी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित डिलिव्हरी कर्मचाऱ्याचा पाठलाग करत भाड्याच्या फ्लॅटचा शोध घेतला. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मुलीची सुटका केली.

पलंगावर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळली मुलगी

पोलीस खोलीत पोहोचले तेव्हा पीडित मुलगी पलंगावर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत पडली होती. आरोपी जवळच बेल्ट घेऊन उभा होता, तर पलंगाजवळ चाकू आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुलीच्या शरीरावर सुमारे २० जखमा, तसेच मनगट आणि मानेजवळ चाकूच्या जखमांच्या खुणा आढळल्याचं वृत्त आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत.

हँडकफ, बेल्टसह इतर साहित्य जप्त

दरम्यान पोलिसांनी भाड्याच्या फ्लॅटमधून हँडकफ, चामड्याचे बेल्ट आणि ऑनलाइन मागवण्यात आलेल्या इतर वस्तू जप्त केल्या आहेत. या वस्तूंचा गुन्ह्यात वापर झाला होता का, याची न्यायवैद्यकीय तपासणी केली जात आहे.

आरोपी निर्मय पाखरे कोण?

निर्मय पाखरे हा मुंबईत बीबीएचं शिक्षण घेत असून, तो ठाण्यातील प्रतिष्ठित डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. तो एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मोबाईलचे पासवर्ड देण्यास नकार

पीडित मुलगी ओलीस असताना तिचा मोबाईलही आरोपीच्या नियंत्रणात होता, असा पोलिसांचा संशय आहे. मात्र, आरोपीने स्वतःच्या आणि मुलीच्या मोबाईलचे पासवर्ड देण्यास नकार दिला आहे.

पोलिस आता न्यायवैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईल, इंस्टाग्राम अकाऊंट आणि इतर डिजिटल उपकरणांची तपासणी करत आहेत. आरोपीने हा गुन्हा आधीपासून नियोजन करून केला होता का आणि यापूर्वी आणखी कोणाला अशाच पद्धतीने लक्ष्य केलं होतं का, याचाही तपास सुरू आहे.

या प्रकरणी आरोपीविरोधात पॉक्सो कायदा, अपहरण आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च