मुंबई : औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिल्यानंतर सोमवारी रात्री नागपूरमध्ये दंगल उसळली. नागपूरमधील दंगलीचे मंगळवारी विधानसभेत पडसाद उमटल्यानंतर सभागृहात व सभागृहाबाहेर यावरून राजकीय शिमगा पाहायला मिळाला. दरम्यान, ‘छावा’ सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आला आहे. ‘छावा’ सिनेमानंतर लोकांचा राग समोर येतोय. नागपूर येथील दंगल पूर्वनियोजित असल्याचे निदर्शनास आले असून दंगा करण्याचा प्रयत्न केला, तर जात-धर्म बाजूला ठेवून कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. विरोधकांनी मात्र केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना, अशा दंगली होत असल्याने सत्ताधारी आणि गृहमंत्र्यांवर या दंगलीचे खापर फोडले.
नागपूर येथील हिंसाचारात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. नागपूरमधील हिंसाचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी निवेदन सादर केले. फडणवीस म्हणाले की, “छावा सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आला आहे. छावा सिनेमानंतर लोकांचा राग समोर येतोय. महाराष्ट्र साधू-संतांची भूमी आहे. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. राज्याला इच्छित उद्दिष्ट गाठायचे असेल तर नागरिकांना कायदा-सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. सध्या अनेक धर्मांचे सण सुरू आहेत. त्यामुळे सर्व लोकांनी एकमेकांविषयी आदरभाव बाळगावा.”
नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा सविस्तर तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सभागृहात मांडला. नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ‘औरंगजेबाची कबर हटाव’ असे नारे देत सोमवारी आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी गवताच्या पेंड्याची औरंगजेबाची प्रतीकात्मक कबर जाळली. याप्रकरणी गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर दुपारी ३ वाजून ९ मिनिटांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वातावरण शांत होते. मात्र, सायंकाळनंतर अफवा पसरवण्यात आली की, सकाळी आंदोलकांकडून जी प्रतीकात्मक कबर जाळण्यात आली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. हे वृत्त पसरल्यानंतर नमाज वाचून परत येत असलेल्या २०० ते २५० जणांच्या जमावाने नारेबाजी सुरू केली. आम्ही आग लावून टाकू, अशी हिंसक भाषा केली. तेव्हा पोलिसांनी बळाचा सौम्य वापर केला, अश्रुधूर सोडला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मात्र, मुस्लिम समुदायाच्या लोकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर मुस्लिम समुदायाच्या लोकांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि त्यांच्या तक्रारीची नोंद केली. मात्र त्याचवेळी हंसापुरी भागात २०० ते ३०० लोकांच्या जमावाने हातात काठ्या घेऊन दगडफेक सुरू केली. त्यांच्या तोंडावर फडकी गुंडाळली होती. या जमावाने हंसापुरीत १२ दुचाकींचे नुकसान केले. काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर भालदारपूर भागात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ८० ते १०० लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि सौम्य बळाचा वापर केला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
११ ठिकाणी संचारबंदी लागू
११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एंट्री पॉइंटवर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यात तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोदरानगर, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
पूर्वनियोजित कट
नागपूर येथील हिंसाचाराची घटना हा पूर्वनियोजित कट असल्याचे निदर्शनास येत आहे. एका ट्रकमध्ये भरून दगड सापडले. शस्त्रास्त्रेही मोठ्या प्रमाणावर सापडली. एका डीसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यामध्ये काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न होता. या लोकांवर कारवाई केली जाईल. कोणालाही कायदा-सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे, अशा लोकांना काही झाले तरी सोडले जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
नागपुरातील शाळा, महाविद्यालयांना सुटी
नागपूरमध्ये दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. दंगलीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शाळा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसेच मुख्याध्यापकांनी स्थानिक स्थिती बघून निर्णय घ्यावेत, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. शाळांच्या ग्रुपवर सकाळी सुट्टीचे मेसेज टाकून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना सूचना दिली आहे. त्यामुळे स्कूल बसेसच्या स्टॉपवर जाऊन विद्यार्थी घरी परतले.
नागपूरला वर्दळीच्या रस्त्यांवर शुकशुकाट
नागपूरमध्ये सोमवारी रात्री औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरून मोठा हिंसाचार झाल्यानंतर मंगळवारी येथील अनेक भागांत संचारबंदी लावण्यात आली आहे. यामुळे नेहमीच वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. पोलिसांकडून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्राला पुढचे मणिपूर बनवायचे आहे का? - आदित्य ठाकरे
“नागपूरमध्ये हिंसाचाराच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री कार्यालयाने प्रतिक्रिया का दिली नाही? जेव्हा अशी घटना घडणार असते, तेव्हा पहिला अहवाल राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृह विभागाकडे येतो. त्यांच्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नव्हती का? मला वाटते की, भाजप महाराष्ट्राला पुढचे मणिपूर बनवू इच्छित आहे. मणिपूरमध्ये २०२३पासून हिंसाचार सुरू आहे. आता भाजप महाराष्ट्रावरही तीच परिस्थितीत आणू इच्छित आहे,” अशी टीका शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
सरकारच चिथावणी देत आहे -असदुद्दीन ओवेसी
मी या हिंसाचाराचा निषेध करतो. पण, तुम्ही सगळ्यांकडे व्यवस्थित बघा. जी विधाने मंत्र्यांनी दिली आहेत. तुम्ही तर भारतीय संविधानाचा शपथ घेतली आहे. मग तुम्ही चिथावणीखोर विधाने का करत आहात? गेल्या काही आठवड्यांपासून जी विधाने महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून केली जात आहेत. ते बघण्याची गरज आहे. सगळ्यात मोठी चिथावणी तर सत्तेकडून आहे. सरकारच चिथावणीखोर विधाने करत आहे. यात सरकारचीच चूक आहे, गुप्तचर यंत्रणांचे हे अपयश आहे, अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली.
एका विषारी मंत्र्याकडून द्वेष पसरवण्याचे काम - प्रकाश आंबेडकर
राज्यातील एका विषारी मंत्र्याकडून दररोज समाजात द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले की, “या घटनेसाठी एकप्रकारे राज्य सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्र सरकारमधील एक विषारी मंत्री दररोज खुलेआमपणे समाजात द्वेष पसरवण्याचे व दुही पिकवण्याचे काम करत आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात दोन समाजात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोक आणले जात आहेत. हा एका मोठ्या सूनियोजित कटाचा भाग आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करतो.”
औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर टाकून द्या - उदयनराजे भोसले
नागपूरच्या दंगलीचे कोणीच समर्थन करू शकत नाही. दंगलखोरांना जात-पात नसते. सर्वधर्म समभावाचे विचार देशाला पुढे घेऊन जातात. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा शासनमान्य असणारा इतिहास प्रकाशित करावा म्हणजे वाद होणार नाहीत. औरंग्याच्या कबरीचे उदात्तीकरण होता कामा नये, तो काही संत नव्हता. त्याची कबर काढून देशाच्या बाहेर टाकून दिली पाहिजे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
नागपुरात दंगल कुणी पेटवली? - संजय राऊत
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करायचे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा आहे. औरंगजेबाची ढाल घेऊन काही लोक या राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली पेटवत आहेत. सरकार तुमच्या विचाराचे आहे तर मग दंगे कशाला करता? मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हातात कुदळ-फावडे घेऊन कबर आहे तिथे जावे आणि लोकांच्या इच्छा पूर्ण कराव्या. नागपुरात दंगल पेटवणारे कोण आहेत, त्यांना कुणाची प्रेरणा आहे, महाराष्ट्रात दंगली का पेटवल्या जात आहेत? हा अत्यंत संशोधनाचा विषय आहे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
आधीच नियोजन केले असावे - एकनाथ शिंदे
ही दंगल पूर्वनियोजित होती, असे प्रत्यक्षदर्शींकडून पुरावे मिळत आहेत. दंगल झालेल्या भागात एके ठिकाणी दररोज १००-१५० दुचाकी उभ्या असतात. मात्र, दंगलखोरांची एकही दुचाकी काल त्याठिकाणी नव्हती. पेट्रोल बॉम्ब, लाठ्या, तलवारी इतक्या मोठ्या प्रमाणात अचानक कशा काय जमवल्या? यासाठी आधीच नियोजन केले गेले असावे, असा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
गृह खाते झोपा काढत होते का? - उद्धव ठाकरे
नागपुरातील दंगल पूर्वनियोजित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असलेले गृह खाते झोपा काढत होते का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. “औरंगजेबाचे समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही. त्याचं थडगं उकरण्याची केवळ भाषा करण्यापेक्षा कृती करा. डबल इंजिन सरकार फक्त वाफा सोडतंय का? मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यात असमर्थता दाखवलेली आहे. गुजरातमध्ये जन्माला आलेल्या औरंगजेबाला ज्या महाराष्ट्राने मूठमाती दिली त्याची कबर तुम्ही उद्ध्वस्त करा आणि तो सोहळा कराल तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंना बोलवा. सोपा विषय आहे. त्यात दंगल करण्याचे कारण काय?,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
औरंगजेब कबरीजवळील रस्त्यावर बॅरिकेडिंग
दरम्यान, औरंगजेब प्रकरणावरून देशभरात मोठा गदारोळ होत असून कबर उखडून फेकण्याचा इशारा काही हिंदुत्ववादी संघटनेने दिल्यामुळे खुल्ताबाद शहरात औरंगजेब कबर परिसरातील दर्ग्याजवळ चोहोबाजूंनी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर बॅरिकेड लावून प्रत्येक वाहनांची, पर्यटकांची आणि नागरिकांची चौकशी पोलीस करत आहेत. औरंगजेब कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे नाव, नंबर, आधार कार्ड तपासले जात असून त्याची नोंद घेतली जात आहे. तसेच कबर परिसरात मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
३३ पोलीस, ५ नागरिक जखमी
नागपूरमध्ये जमावाने एक क्रेन आणि काही चारचाकी वाहने जाळली. या सगळ्या घटनांमध्ये एकूण ३३ पोलीस जखमी झाले. यामध्ये ३ उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हिंसाचाराच्या घटनेत ३३ पोलीस व ५ नागरिक जखमी झाले. यापैकी तिघांना घरी सोडण्यात आले आहे, दोन जण रुग्णालयात आहेत. त्यापैकी एकाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.