नागपूर : नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान आणि इतर ६ आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “पोलिसांवर झालेली दगडफेक ग्लोरिफाय केली जात असून, त्यासोबत ‘अल्लाहू अकबर’, ‘सर तनसे जुदा’ असे कॅप्शन सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत. हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या पोस्ट करण्यात आल्या. अशा लोकांवर देशद्रोहाचे कलम लावण्यात येईल. आतापर्यंत ६ आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे. हिंसाचार प्रकरणात ‘एनआयए’ तपास करणार की नाही, याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल. तर ‘एटीएस’चा निर्णय हा राज्य सरकार घेईल, असे सायबर पोलीस विभागाचे डीसीपी लोहित मतानी यांनी सांगितले.
नागपूरमधील संचारबंदी हटवली
नागपूर शहरातील महाल भागात उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी दंगलीत सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे नागपूर शहरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णत: उठवली असून काही भागात संचारबंदीत शिथिलता आणली आहे. गुरुवारी दुपारपासून नंदनवन आणि कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आली आहे.