नंदूरबार : नंदूरबार-शहादा मार्गावर प्रवासी टॅक्सी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी शहादा तालुक्यातील लांबोळा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. नंदुरबारहून शहादाच्या दिशेने एक प्रवासी टॅक्सी जात होती. त्याच सुमारास मालवाहू ट्रक त्याच मार्गावरून जात होता. यादरम्यान दोघांची जोरदार धडक झाल्याने दुर्दैवी अपघात झाला.
या अपघातात टॅक्सी आणि ट्रकचा चक्काचूर झाला. शिवाय या दुर्घटनेत पाच जण जखमी असून २ जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचा तपास पोलीस करत आहेत.