नाशिक : “अभिनंदन! तुम्ही एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे!” गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी ही घोषणा करताच गोदावरीचा पवित्र तीर ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. एकाच वेळी ३०३ जणांनी शंखनाद करण्याचा अमेरिकेचा पूर्वीचा विक्रम मागे टाकत ५१७ जणांनी सामूहिक शंखनाद केल्याने नाशिकच्या नावे ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाल्याचे आयोजकांनी सांगितले. भक्ती, श्रद्धा, सामूहिक शक्ती आणि भारतीय संस्कृतीचा गौरव अधोरेखित करणारा हा सोहळा आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी ठरला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर गोदाकाठावरील यशवंत महाराज पटांगण येथे या सामूहिक शंखनादाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
एकाच वेळी ५१७ शंखवादकांनी केलेल्या शंखनादामुळे परिसरात चैतन्यपूर्ण आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. गोदावरीच्या तीरावर घुमलेल्या शंखध्वनीने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. या उपक्रमामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या वेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नियोजन विभागाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग, समन्वयक मिलिंद बेर्लेकर, अनंत विजय शंखनाद पथकाच्या वृषाली घोलप आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह साधू-महंत, शंखनाद वादक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोदाकाठावर आध्यात्मिक वातावरणनिर्मिती
सामूहिक शंखनादाच्या माध्यमातून नाशिकच्या धार्मिक परंपरेचा गौरव करण्याबरोबरच सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर आध्यात्मिक वातावरणनिर्मिती करण्यात आली. सामूहिक सहभागातून साकारलेल्या या उपक्रमाने गोदाकाठावर भक्ती आणि सांस्कृतिक अभिमानाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.