नाशिक : एकाच दिवसात सहा फ्लाइट्सच्या माध्यमातून तब्बल १६२३ प्रवाशांची ने-आण करून नाशिक विमानतळाने आगळावेगळा विक्रम नोंदवला आहे. रविवारी ७९३ प्रवाशांना नाशिक येथून इतरत्र नेण्यात आले, तर इतर ठिकाणांहून ८३० प्रवासी नाशिक विमानतळावर दाखल झाले. रविवारच्या या 'फ्रिक्वेन्सी'ने स्थानिक विमानतळावर गेल्या ७ जून रोजी नोंदवलेला १३३४ प्रवासी संख्येचा विक्रम मोडीत काढला.
गेल्या काही महिन्यांपासून नाशिककर विमान प्रवासाला पसंती देत असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून अधोरेखित झाले आहे. वेळेची बचत आणि सुखकर प्रवासाचे गणित यामुळे साध्य होते. विशेषतः, मुंबई, दिल्ली, बंगळूरू आदी शहरांत जाणाऱ्या नाशिककर प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. चालू आठवड्यापासून नाशिकहून जाणाऱ्या फ्लाइट्सच्या संख्येत वाढ होणार असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे येथे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसते.
दिल्लीसाठी दुसऱ्या फ्लाइटचा श्रीगणेशा
नाशिकहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता इंडिगो कंपनीने रविवारपासून दिल्लीसाठी दुसऱ्या फ्लाइटचा श्रीगणेशा केला. उद्योग-व्यवसाय क्षेत्रांतील व्यक्तींना सोयीस्कर व्हावे, यासाठी नाशिकहून दिल्लीसाठी रात्री ८.५० वाजता फ्लाइट निघणार असून दिल्लीहून नाशिकसाठीच्या प्रवासाची वेळ सायंकाळी ६.२० वाजताची असणार आहे. पहिल्याच दिवशी या सेवेला उत्तम प्रतिसाद लाभला. या सेवेमुळे विदेशात जाण्यासाठी दिल्लीहून कनेक्टेड फ्लाइटचा मेळ घालता येणार आहे.
आजपासून जयपूर, इंदूर, हैदराबाद सेवा
नाशिक विमानतळावरून मंगळवार, २८ ऑक्टोबरपासून जयपूर, इंदूर आणि हैदराबाद या देशातील प्रमुख शहरांसाठी विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यामुळे नाशिकच्या कनेक्टीव्हिटीला आणखी बळ प्राप्त होईल. सदर सेवा आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सुरू राहतील. जयपूरहून विमान सकाळी ११.४५ वाजता निघून इंदूरला दुपारी १.३० वाजता, तर तेथून विमान नाशिकला दुपारी २.४० ला नाशिकला पोहचेल. नाशिकहून हाच प्रवास दुपारी ३ वाजता सुरू होऊन इंदूर ( दुपारी ४.१५ ) मार्गे जयपूरला सायंकाळी ५.३० वाजता पोहचेल. हैदराबादहून सकाळी ६.५० वाजता निघणारे विमान नाशिकला ८.४० वाजता पोहचेल, तर नाशिकहून सकाळी ९ वाजता निघणारे विमान हैदराबादला १०.४५ वाजता पोहचेल.