नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सुरु असलेले खुनाचे सत्र कायम आहे. आज पहाटे हत्येच्या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. पहाटेच्या सुमारास नाशिकरोडच्या जय भवानी रोड परिसरात अमोल मेश्राम या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन संशयित आरोपींनी चॉपरने वार करत अमोल यास संपवले. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी मालमत्ता वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मयत अमोल मेश्राम हा नाशिकरोड येथील गुरुद्वारा येथे नियमित सेवा देतो. मंगळवारी पहाटे तो तेथून परतत असताना संशयित अमन शर्मा आणि कुणाल सोदे यांनी त्याच्यावर जय भवानी रोड परिसरातील चव्हाण मळा येथे चॉपरने वार करत गंभीर जखमी केले. त्यातच अमोलचा मृत्यू झाला. दोन्ही संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. अमोल आणि कुणाल यांचे मालमत्ता संदर्भात वाद असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीने कळस गाठला आहे. सातत्याने समोर येणारे खून, हाणामाऱ्या, तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारच्या घटनांमुळे शहरातील लोकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.