महाराष्ट्र

नाशिक कुंभमेळा: तपोवनासाठी होणार १८०० झाडांची कत्तल? दिग्दर्शक सचिन गोस्वामींची पोस्ट चर्चेत; म्हणाले, "श्रीराम तसेच राहिले होते ना?"

नाशिकच्या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात ११५० एकरांवर साधुग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

प्रयागराजमधील कुंभमेळ्यानंतर आता नाशिकमध्ये २०२७ होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात ११५० एकरांवर साधुग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अभिनेते सयाजी शिंदे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीही या वृक्षतोडीला विरोध केला आहे.

नाशिकच्या पर्यावरणाला धोका

साधुग्रामसाठी महापालिकेच्या ५४ एकर जागेवरील झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सुमारे १८०० झाडांवर पिवळ्या खुणा दिसून आल्या, ज्यामुळे अनेकांनी हरकती नोंदवल्या असून, १८ नोव्हेंबरला हरकतींची मुदत संपली आहे. पर्यावरणप्रेमींनुसार या जागेवर कडूलिंब, चिंच, जांभूळ यांसारखी भारतीय, सावलीदार व परिसंस्थेसाठी महत्वाची वृक्षप्रजाती आहेत. अनेक वृक्ष इतके जुने आणि मोठे आहेत की, त्यांना हेरिटेज ट्री म्हणूनही घोषित करता येऊ शकते. अशा वृक्षतोडीमुळे नाशिकच्या हवामानावर, जलसाठ्यावर आणि हवेच्या गुणवत्तेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

१८०० झाडं का कापायची?

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी या वृक्षतोडीला विरोध करत म्हटले की, "कुंभ मेळ्यातील साधू संतांना तपोवनात राहूटी उभारून व्यवस्था करा." यासोबतच,"श्रीराम तसेच राहिले होते ना? १८०० झाडं का कापायची?" असा सवाल सचिन गोस्वामी यांनी उपस्थित केला.

सयाजी शिंदे यांचा कडक विरोध

'सह्याद्री देवराई'चे प्रमुख आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनीही या निर्णयावर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “रामायणातील दंडकारण्य, तपोभूमी तपोवन या पवित्र क्षेत्रातच जर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली, तर तो अध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या चुकीचा संदेश ठरेल. तपोवनमधील झाडांसाठी होणाऱ्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. एक झाड तोडल्यावर दहा झाडं लावू म्हणणं म्हणजे चेष्टा आहे का? आतापर्यंत कुठे लावली झाडं?” झाडं तोडून दाखवा, आम्ही शंभर लोकं जीव देऊ.”असा इशारा सयाजी शिंदे यांनी दिला.

महापालिकेचं स्पष्टीकरण- ‘ही वृक्षतोड नव्हे, फक्त सर्वेक्षण’

पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेल्या आरोपांवर नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी परिपत्रक जारी केले. त्यामध्ये त्यांनी सांगितले, १८२५ झाडांवर खुणा करणे म्हणजे वृक्षतोड नव्हे; हा फक्त सर्वेक्षणाचा भाग आहे. फक्त १० वर्षांखालील व बांधकामात बाधा आणणारी झाडं तोडली जाणार आहेत. जुन्या, विशाल आणि ऐतिहासिक मूल्य असलेल्या वृक्षांना जतन केले जाईल. एखादे ७ वर्षांचे झाड तोडावे लागल्यास त्या बदल्यात ७ नवीन झाडांचे वृक्षारोपण करण्यात येईल. मनपा तपोवनमधील वृक्षसंवर्धनासाठी कटिबद्ध आहे, असेही स्पष्टीकरण महापालिकेने दिले.

नाशिकला आधुनिक शहर करणार - मुख्यमंत्री फडणवीस

येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने होणाऱ्या नाशिक शहरातील पाच हजार ६५७ कोटी ८९ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १० दिवसांपूर्वी करण्यात आले.

"सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार", अशी ग्वाही त्यावेळी फडणवीस यांनी दिली होती. या कुंभमेळ्यात साधू-महंतांसाठी उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामसाठी वृक्षतोड करण्यात येणार असल्याने सर्व स्तरातून या वृक्षतोडीला विरोध केला जातोय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दुराव्यावर एकनाथ शिंदेंनी सोडलं मौन; "तुम्ही सगळे फक्त ब्रेकिंग न्यूजसाठी...

गौरी गर्जे प्रकरण : आत्महत्या की हत्या? प्रेयसी गरोदर, अफेअर लपवण्यासाठी ब्लॅकमेलिंग; कुटुंबियांचे अनंत गर्जेवर गंभीर आरोप

१० महिन्यांचा संसार, नवऱ्याचे अनैतिक संबंध, शेवटी टोकाचं पाऊल; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

चोरीच्या संशयावरून १४ वर्षाच्या मुलासोबत राक्षसी कृत्य; लोखंडी बैलगाडीला बांधलं, खालून आग लावली, धुळ्यातील संतापजनक घटना

पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रास्त्र रॅकेटचा पर्दाफाश, ३६ जण ताब्यात