महाराष्ट्र

नाशिकमध्ये मध्यरात्री राडा! जमावाची पोलिसांवर दगडफेक, ३१ पोलीस जखमी, १५ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये मंगळवारची मध्यरात्र उलटून गेल्यानंतर मोठा राडा झाला. काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आणि अधिकाऱ्यांवर जमावाने तुफान दगडफेक केली.

Krantee V. Kale

नाशिकमध्ये मंगळवारची मध्यरात्र उलटून गेल्यानंतर मोठा राडा झाला. काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आणि अधिकाऱ्यांवर जमावाने तुफान दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराचा मारा करावा लागला. या घटनेत सुमारे ३१ पोलीस जखमी झाले आहेत. तर आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस नाशिक पोलिसांनी १५ दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास कारवाईसाठी पोलीस आणि अधिकारी तेथे पोहोचले. परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आधी दर्ग्यातील धर्मगुरु आणि प्रशासनाने मिळून धार्मिक प्रक्रिया पार पाडली. पण, रात्री १.३० ते २.०० वाजेच्या सुमारास अचानक उस्मानिया चौकाकडून आलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेकीला सुरूवात केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

अनेक पोलिसांच्या हाता-पायाला जखमा झाल्या. अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दर्ग्याच्या तोडकामाला सुरूवात झाली आणि दोन जेसीबीच्या सहाय्याने ९० टक्के बांधकाम पाडण्यात आले. आता केवळ लोखंडी भाग हटवण्याचे काम बाकी आहे. पोलिस आणि महानगरपालिकेच्या वतीने संयुक्तपणे आणि मुस्लिम धर्मगुरू व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी उचलल्या ५७ दुचाकी, परिसरात तगडा बंदोबस्त

दरम्यान, दगडफेकीत ३१ पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. तर, ५७ दुचाकीही पोलिसांच्या हाती लागल्यात. या दुचाकी संशयीत हल्लेखोरांच्या असण्याची शक्यता आहे. तथापि, सकाळपासून परिसरात शांतता असून येथील वाहतूक पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त कायम राहणार आहे.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

जपान भारतात ६० हजार कोटींची गुंतवणूक करणार; दोन्ही देशात संरक्षण व आर्थिक भागीदारीचे करार

नाकापेक्षा मोती जड