नाशिक शहरासह जिल्ह्यात दोन महिन्यापासून पावसाने ओढ दिली होती. मागील काही दिवसात तर थेट उन्हाचा चटका जाणवत होता. अखेर गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार कमबॅक केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच गोदावरीच्या पुराचे मापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीला पुराचे पाणीच लागलेले नव्हते. मात्र रात्रीपासून पावसाची धुवांधार बॅटिंग सुरु असल्याने गंगापूर धरणात लक्षणीय वाढ झाली आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी एक वाजता ५२० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आले. धरणातील पाणी नदीत प्रवाहीत झाल्याने गोदामाई खळाळली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.