नाशिक : आश्रमशाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करीत पालकांसह ग्रामस्थांनी मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलवर आणून निषेध नोंदवल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील कळवण तालुक्याच्या चणकापूर येथे सोमवारी ( दि. ८ ) घडली. रोहित विलास बागुल ( १० वर्षे ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे आश्रमशाळा व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दोनच दिवसांपूर्वी कळवण तालुक्यातील कनाशी येथील एका आश्रमशाळेत पन्नासहून अधिक विद्यार्थीनीना पिण्याच्या पाण्याद्वारे विषबाधा झाली होती. या प्रकारानंतर राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी चणकापूर येथे विद्यार्थी मृत झाल्याची घटना उघडकीस आली. रोहित हा तीन दिवसांपासून आजारी होता. मात्र आश्रमशाळा प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्याचे पालक आणि ग्रामस्थांनी केला. संतप्त ग्रामस्थांनी रोहित याचा मृतदेह शाळेतील मुख्याध्यापकांच्या टेबलवर आणून निषेध नोंदवला. तब्बल पाच तास मृतदेह टेबलवर पडून राहिला. आश्रमशाळेच्या अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांना निलंबित केल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारून त्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आश्रमशाळांमधील कारभार सुधारण्याची तंबी प्रशासनाला देण्यात आली आहे.
सेन्ट्रल किचनमधील जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, विद्यार्थ्याच्या मृत्युनंतर आश्रमशाळांना पुरवण्यात येणाऱ्या सेन्ट्रल किचनमधील जेवणाच्या दर्जावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. निकृष्ट भोजनामुळेच विद्यार्थ्यांच्या आजारपणात वाढ होत असल्याने सेन्ट्रल किचनमधील जेवण तत्काळ बंद करण्याची मागणी अनेक पालकांसह आदिवासी संघटनांनी केली आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा उपचाराअभावी मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामुळे आश्रमशाळांतील पायाभूत सुविधा किती कमकुवत आहेत, याचे कनाशी घटनेनंतर आताच्या प्रकाराने प्रत्यंतर आले आहे. यासाठी कोणी व्यक्ती जबाबदार असेल तर त्याची गंभीर दाखल घेतली जाईल. आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी कुचंबना सहन केली जाणार नाही. प्रशासकीय स्तरावर योग्य पावले उचलली जाणे अत्यंत गरजेचे आहे. - आ. नितीन पवार, कळवण