लासलगाव : येवला तालुक्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. रेंडाळे येथील जालिंदरनाथ मंदिर परिसरात पाण्याअभावी एका काळविटाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वनविभागाने तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रेंडाळे येथील जालिंदरनाथ मंदिर परिसरात साडेचार वर्षे वयाचे काळवीट सकाळी साडेअकराच्या सुमारास हातपाय झटकत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तत्काळ त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणांतच या काळविटाचा मृत्यू झाला. वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. मात्र, या पाणवठ्यांमध्ये पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाणवठे तयार करण्याबरोबरच त्यामध्ये नियमित पाणी भरण्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात अनेक वर्षांपासून काळवीट, हरीण, मोर, ससे, तरस, लांडगे, खोकड, उदमांजर आणि कोल्हे अशा विविध वन्यप्राण्यांचा अधिवास आहे.