नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्यभर रंगीबेरंगी सजावट, देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना आणि धार्मिक सोहळ्याची लगबग सुरू आहे. बाजारपेठांमध्ये पूजा साहित्य, पारंपरिक पोशाख आणि सजावटीच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी दिसून येत होती. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर आनंद आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात ३,८६२ देवींच्या मूर्ती आणि ७,५३२ घटांची प्रतिष्ठापना होणार असल्याने शनिवारी, रविवारी घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी देवीचे सुंदर मुखवटे, सुगंधी दिवे, सजावटीची वस्त्रे आणि पूजेचे विविध साहित्य तसेच गरब्या खेळण्यासाठी आकर्षक घागरा-चोळी, तसेच सजावटीसाठी जॅकेट आणि इतर पारंपरिक पोशाख बाजारात उपलब्ध झाल्याने शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये खासकरून जांभळी नाका, नौपाडा, राम मारुती रोड परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली.
शहरातील सर्व मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्थानक परिसर बाजारपेठ, जांभळी नाका, नौपाडा, राम मारुती रोड या ठिकाणी घटस्थापना आणि पूजेच्या साहित्याने बाजार फुलले आहेत. बाजारात सुगड, माती, देवी मुखवटे, दागिने, नारळ, धान्य असे घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. खरेदीदार पारंपरिक रंगीत पोशाख निवडण्यासाठी उत्सुकतेने स्टॉल्सभोवती गर्दी केल्याचे दिसून आले. त्याचबरोबर देवीचे सुंदर मुखवटे, सुगंधी दिवे, सजावटीची वस्त्रे आणि पूजेचे विविध साहित्य उपलब्ध झाले आहे.
नवरात्रोत्सवात रास-गरब्याला विशेष महत्त्व असल्याने नागरिक पारंपरिक कपडे खरेदीसाठीही बाजारात आले होते. गरब्यासाठी घागरा, चनियाचोली, जॅकेट, कुर्ता, दुपट्टा आणि त्यावर शोभून दिसणारे ऑक्साईडचे दागिने, कुंदन, मोती व शिंपले वापरून बनवलेले दागिने विक्रीसाठी आले. यावर्षी लहान-मोठ्या आकाराच्या टोपल्या ३० ते २०० रुपये या दरात उपलब्ध होत्या. शनिवारी दुपारपासून नागरिक पूजा व साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करत असल्याने परिसरात वाहतूककोंडी निर्माण झाली. जांभळी नाका बाजारपेठेच्या फुलबाजारातही खरेदीसाठी नागरिकांची झुंबड होती. घटस्थापनेसाठी नऊ दिवस लागणाऱ्या झेंडूच्या फुलांना यावेळी मोठी मागणी होती.
तरुणाईची घागरा-चोलीसाठी गर्दी!
नवरात्रोत्सवानिमित्ताने ठाणे शहरातील वातावरण पूर्णपणे उत्साहाने भरलेले आहे. या पारंपरिक नृत्याच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी शहरातील तरुणाई मोठ्या आतुरतेने गरबा खेळण्याची तयारी करत आहे.
विशेषतः गरबा आणि दांडियासाठी लागणाऱ्या पारंपरिक वेशभूषा आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी लगबग सुरू आहे. यावर्षी बाजारात आकर्षक घागरा-चोली आणि रंगीत जॅकेट्सना विशेष मागणी आहे. तसेच, कुंदन, मोती व शिंपले वापरून सजवलेले पारंपरिक दागिने, कवड्यांचे हार आणि नक्षीदार पोटली बॅग्ज खरेदी करण्यासाठी तरुण-तरुणींची झुंबड उडत आहे. विविध रंगांमध्ये आणि नवनवीन डिझाईन्समध्ये उपलब्ध असलेले हे दर्जेदार पोशाख निवडण्यासाठी स्टॉल्सवर मोठी गर्दी जमत आहे.