'मराठा साम्राज्याचा नकाशा' वगळल्याने विरोधक आक्रमक; NCERT च्या पुस्तकात सुधारणा करण्यासाठी राज्याचे केंद्र सरकारला पत्र  
महाराष्ट्र

'मराठा साम्राज्याचा नकाशा' वगळल्याने विरोधक आक्रमक; NCERT च्या पुस्तकात सुधारणा करण्यासाठी राज्याचे केंद्र सरकारला पत्र

‘एनसीईआरटी’ने तयार केलेल्या आठवीच्या हिंदी आणि उर्दू पुस्तकातील ‘मराठा साम्राज्याचा नकाशा’ वगळण्याच्या निर्णयाचे संतप्त पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. विरोधकांनी याबाबत ठोस कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला.

Swapnil S

मुंबई : ‘एनसीईआरटी’ने तयार केलेल्या आठवीच्या हिंदी आणि उर्दू पुस्तकातील ‘मराठा साम्राज्याचा नकाशा’ वगळण्याच्या निर्णयाचे संतप्त पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. विरोधकांनी याबाबत ठोस कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. अखेर राज्य सरकारने यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठविले असून त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत ‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तकातील ‘मराठा साम्राज्याचा नकाशा’ वगळल्याबाबत नियम ९३ अन्वये चर्चा उपस्थित केली होती. त्यावेळी बोलताना पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. हा विषय मराठा साम्राज्याच्या नकाशाच्या संदर्भातील आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात संबंधित व्यक्तीला ७ जानेवारी २०२६ रोजी उत्तर मिळालेले आहे. तसेच ३० जानेवारी २०२६ रोजी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा व्यापक स्वरूपात अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी ‘सीबीएसई’ला विनंती करण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे. त्याच अनुषंगाने ‘एनसीईआरटी’च्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात शिवरायांवर ‘द राईज ऑफ महाराष्ट्र’ या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. पण जेव्हा हा धडा तयार करण्यात आला आणि त्याबाबत चर्चा झाली, तेव्हा त्या नकाशातील त्रुटी सरकारच्या लक्षात आल्या नव्हत्या का?, असा सवाल पाटील यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील धडा अभ्यासक्रमात समाविष्ट झाला ही चांगली गोष्ट आहे. परंतु याच उत्तराच्या शेवटच्या भागात, इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या पुस्तकांतून तो नकाशा वगळण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात केंद्र शासनाकडे आवश्यक सुधारणा करण्याची विनंती करण्यात आली आहे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. जर हा विषय इतका गंभीर असेल, तर राज्य सरकारने तत्काळ शिष्टमंडळ नेऊन केंद्र सरकारशी चर्चा करून त्वरित दुरुस्ती करून घ्यायला हवी होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता सरकार नेमकी कोणती ठोस आणि कडक कारवाई करणार आहे? अशी विचारणा पाटील यांनी केली.

राज्याची केंद्र सरकारला विनंती

‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम ‘एनसीईआरटी’ तयार करते. आतापर्यंत ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त दोन ते अडीच पानांमध्ये होता. यापूर्वीच्या काळातील मोगलांचा, पेशव्यांचा, ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास होता. तो कमी करून २२ पानांमध्ये पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांवर विस्तृत असा इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमाच्या आठवीच्या पुस्तकात नकाशा आहे. पण उर्दू आणि हिंदी माध्यमाची पुस्तके पाहिली तेव्हा नकाशा दिसून येत नाही, अशी कबुली देत यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी ९ मार्च रोजी केंद्र सरकारला लेखी विनंती केली असून याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे यावेळी उत्तर देताना पंकज भोयर यांनी सांगितले.

सभागृहात घोषणाबाजी

यावेळी मंत्र्यांच्या उत्तराला हरकत घेत विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. यावेळी राज्यमंत्री आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या गोंधळात विरोधकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय भवानी, जय शिवाजी,’ अशा घोषणा दिल्या. अखेर या गोंधळात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करत विरोधकांना शांत राहण्याचे आणि मंत्र्यांना फक्त नकाशापुरते बोलण्याचे आवाहन केले. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

LPG ग्राहकांनो लक्ष द्या! e-KYC अनिवार्य; मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा ही प्रक्रिया