महाराष्ट्र

NCP च्या दोन गटांत रस्सीखेच! सुनेत्रा पवारांना मंत्रिमंडळात घेण्याची राष्ट्रवादीची मागणी; तर विलिनीकरणासाठी शरद पवार गट आग्रही

भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन पक्षाचे नेतृत्व करावे, अशी सूचनाही केली आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना स्थान देण्याची मागणी केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटानेही दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचे सुरू असलेले प्रयत्न पुढे नेण्यात यावेत असा आग्रह धरला आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन पक्षाचे नेतृत्व करावे, अशी सूचनाही केली आहे. ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते आणि अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत यांना राज्य मंत्रिमंडळात सामावून घेण्याची जनतेची इच्छा आहे.

नेतृत्वाशी चर्चा करून निर्णय...

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, ते पक्षाध्यक्षही होते, राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत विचारले असता झिरवाळ यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला सांगितले की, लोकांना ‘वहिनी’ (सुनेत्रा पवार) यांना मंत्रिमंडळात पाहायचे आहे. तसेच सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात घेण्याबाबत आम्ही आमच्या नेतृत्वाशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असे झिरवाळ यांनी पुणे जिल्ह्यातील बारामती येथील त्यांच्या गावी झालेल्या अंत्यसंस्कारानंतर सांगितले. झिरवाळ हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

प्रतिस्पर्धी गटांच्या विलिनीकरणाविषयी विचारले असता, सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षातील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्याबाबत ते म्हणाले, ‘दोन्ही गट आधीच एकत्र आहेत(स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी). वेगवेगळे राहण्यात अर्थ नाही, हे सर्वांना उमगले असून आपल्याला एकत्र राहावे लागेल’. राष्ट्रवादीचे आणखी एक नेते आणि अजित पवार यांचे विश्वासू प्रमोद हिंदुराव यांनीही सुनेत्रा पवार यांनी आपल्या पतीचा वारसा पुढे न्यावा आणि पक्ष कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी, अशी भूमिका मांडली.

विलिनीकरणाबाबत झालीय प्राथमिक चर्चा...

यापूर्वी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या सुनेत्रा पवार यांना बारामतीत राष्ट्रवादीचा (शरदचंद्र पवार गट) कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.दरम्यान, राज्यातील राष्ट्रवादीचे(शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पीटीआयला सांगितले की, महाराष्ट्रातील नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत एकत्र बसून निर्णय घेण्याविषयी अजित पवार यांनी स्वतःच चर्चा केली होती व तशा हालचालीही सुरू झाल्या होत्या. विलिनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा आधीच झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांसाठी (१५ जानेवारी रोजी झालेल्या) दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी आम्ही भेटलो होतो, तेव्हा अजितदादांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या (५ फेब्रुवारीला होणाऱ्या) निवडणुकांनंतर बसून विलिनीकरणावर चर्चा करूया, असे सांगितले होते,‘ असे ते म्हणाले.

अजितदादांच्या इच्छेची पूर्तता करण्याचा प्रयत्न

‘अजितदादा संवेदनशील होते आणि दोन्ही गट एकत्र यावेत, तसेच (पवार) कुटुंब एकसंध राहावे, अशी त्यांची इच्छा होती. ‘आता पुरे झाले’ असे त्यांना वाटत होते. कुटुंब आणि पक्षांना समेट हवा असेल, तर आम्हाला कोणतीही अडचण नाही. आता त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करता येते का, हे पाहावे लागेल,’ असे शिंदे यांनी सांगितले. भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुतीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) सहभागी होण्यास तयार आहे का, असे विचारले असता शिंदे यांनी थेट उत्तर टाळले. ‘सध्या काहीही सांगता येणार नाही. अजितदादांच्या (विलिनीकरणाच्या) इच्छेची पूर्तता करण्याच्या प्रयत्नांना सकारात्मक निकाल लागतो का, ते पाहूया. सत्ताधारी आघाडीत सहभागी व्हायचे की नाही, यावर नंतर चर्चा करता येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अखेरचा दंडवत! अलोट जनसागराच्या उपस्थितीत अजित पवार पंचतत्त्वात विलीन

राजकीय ताणतणावाचे घातक परिणाम

ऐतिहासिक साफसफाई मोहीम

आजचे राशिभविष्य, ३० जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

हिवाळ्यात खा पौष्टिक नाचणीचे पराठे; जाणून घ्या सोपी रेसिपी