भोंदू खरातचा पाय खोलात; व्यवहार केल्यापासून मुलगा बेपत्ता : स्थानिक शेतकऱ्याच्या आरोपानंतर पाथर्डीत संतापाची लाट  
महाराष्ट्र

भोंदू खरातचा पाय खोलात; व्यवहार केल्यापासून मुलगा बेपत्ता : स्थानिक शेतकऱ्याच्या आरोपानंतर पाथर्डीत संतापाची लाट

स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरील नव्या आरोपांमुळे पाथर्डीत संतापाची लाट उसळली आहे. खरातसोबत जमिनीचा व्यवहार केल्यानंतर आपला मुलगा बेपत्ता झाला असल्याचा दावा एका स्थानिक शेतकऱ्याने केला आहे. खरातवर आधीच लैंगिक शोषण आणि जादूटोण्याच्या (अघोरी विद्या) प्रयोगांचे अनेक आरोप असून त्याची चौकशी सुरू आहे...

Swapnil S

मिलिंद सजगुरे/नाशिक

स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरील नव्या आरोपांमुळे पाथर्डीत संतापाची लाट उसळली आहे. खरातसोबत जमिनीचा व्यवहार केल्यानंतर आपला मुलगा बेपत्ता झाला असल्याचा दावा एका स्थानिक शेतकऱ्याने केला आहे. खरातवर आधीच लैंगिक शोषण आणि जादूटोण्याच्या (अघोरी विद्या) प्रयोगांचे अनेक आरोप असून त्याची चौकशी सुरू आहे, त्यातच आता या नव्या तक्रारीमुळे तपासाची तीव्रता अधिक वाढली आहे. नाशिकच्या पाथर्डी परिसरातील शिवाजी ढगे या शेतकऱ्याने आरोप केला आहे की, त्यांनी खरातला आपली जमीन विकली आणि नेमक्या त्याच दिवसापासून त्यांचा मुलगा बेपत्ता आहे.

ढगे यांनी सांगितले की, आपल्या मुलावर नेमका काय प्रभाव टाकला गेला हे त्यांना माहीत नाही, मात्र जमिनीचा व्यवहार आणि मुलाचे बेपत्ता होणे या दोन्ही घटना एकाचवेळी घडल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी खरातवर असाही आरोप केला आहे की, त्याने अनेक शेतकऱ्यांकडून पूर्ण पैसे न देता त्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत.

अमावस्या - पौर्णिमेलाच द्यायचा भेटी...

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, खरातने आपल्या सर्व जमिनींना कुंपण घातले असून तो फक्त अमावस्या आणि पौर्णिमा या विशिष्ट दिवशीच तिथे भेट देत असे. ग्रामस्थांनी असेही सांगितले की, या भेटींदरम्यान दीपक लोंढे नावाचा एक एजंट अनेकदा त्याच्यासोबत दिसायचा. जमिनीच्या व्यवहारादरम्यान स्थानिकांना धमकावण्याचे प्रयत्न झाले, तसेच अशा अनेक व्यवहारांशी संबंधित पैशांची थकबाकी खरातने बुडवली, असेही दावे केले जात आहेत. या आरोपांचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्यामुळे खरातभोवती तपासाचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे, कारण या प्रकरणाच्या सर्व अंगांनी सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनावर आता मोठा दबाव वाढत आहे.

खरात - सहकारी जाधव यांची समोरासमोर चौकशी

अशोक खरात आणि त्यांचा कार्यालयीन सहकारी नीरज जाधव यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान माहिती लपवण्यावरून दोघांमध्ये पोलिसांसमोरच शाब्दिक चकमक उडाल्याचे समजते. तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा दुवा समोर आला आहे. नीरज जाधव याच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्समधून ३० ते ४० महिलांचे संपर्क क्रमांक उघड झाले आहेत.

मंदिर पुजाऱ्यासह तिघांना अटक

एसआयटीने रविवारच्या घडामोडीत मोठी कारवाई करत खरात यांच्या ‘ईशानेश्वर’ मंदिराशी संबंधित तीन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये मंदिराचा पुजारी आणि दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या चौकशीतून या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. खरात यांच्या फार्महाऊसवर नेमके कोणते प्रकार चालत होते आणि कोणत्या कारणासाठी लोकांना तिथे आणले जात होते, याचा तपास अधिकारी करत आहेत. यातून श्रद्धा आणि ‘हिलिंग’च्या नावाखाली नेमके काय चालले होते, याचा पर्दाफाश होऊ शकतो.

माजी मंत्री जयंत पाटील यांच्या चौकशीची मागणी

दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केला आहे की, तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खरात यांना अवाजवी सवलत दिली असून या प्रकरणी पाटील यांचीही चौकशी झाली पाहिजे. दुष्काळग्रस्त सिन्नर भागात खरात यांच्या मालमत्तेनजीक असलेल्या २५ एकरच्या आंब्याच्या बागेसाठी, फार्महाऊससाठी आणि मंदिराच्या परिसरातील झाडांसाठी या पाण्याचा वापर केला जात असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, सध्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एसआयटीने न्यायवैद्यक विभागाशी संपर्क साधला असून खरात यांच्या केबिनमधून द्रव पदार्थ, ग्लास, बाटल्या आणि इतर यंत्रसामग्रीसह मूळ पुरावे तपासासाठी जप्त केले आहेत.

नाशिकमध्ये आणखी एक तक्रार, फिर्यादी महिलेकडून गंभीर आरोप

भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात आणखी एका पीडित महिलेने पुढे येत तक्रार दाखल केली आहे. महिलेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे रविवारी दाखल झालेल्या या गुन्ह्यात अशोक खरात याच्याविरोधात अनेक वेगवेगळे आरोप करण्यात आले आहेत. एसआयटीकडून खरातची सखोल चौकशी केली जात आहे. अशोक खरातच्या कृत्यांचे थेट सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने त्याचे खरे रुप सर्वांच्या समोर आले आहे. मोठमोठ्या लोकांसोबत त्याचे उठणे-बसणे असल्यामुळे त्याच्यावर होणाऱ्या आरोपांवर कुणाचा विश्वास बसला नसता. पण थेट व्हिडीओ समोर आल्याने त्याचे खरे रुप बाहेर आले आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. अघोरी कृत्य करायचा आणि धमक्या द्यायचा. धक्कादायक बाब म्हणजे, ही पीडित महिला जेव्हा उपचारांसाठी येत असे, तेव्हा खरात तिच्या पतीला बाहेर बसवून आतमध्ये 'पूजा-विधी'च्या नावाखाली तिचे लैंगिक शोषण करत होता.

घाबरवण्यासाठी साप, वाघाच्या कातडीचा वापर

एवढेच नव्हे तर, भाविकांना घाबरवण्यासाठी तो नकली साप आणि वाघाच्या कातडीचा वापर करून अघोरी कृत्य करत असल्याचा उल्लेखही पीडित महिला हिने दिलेल्या तक्रारीत केला आहे. जर या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली, तर पीडिता आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अनेक मालमत्ता बळकावल्याचा आरोप

पाथर्डी परिसरात खरातच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन असल्याचे बोलले जाते. राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याला या व्यवहारात मदत केली असावी असा संशय असून, त्याने धाकदपटशा दाखवून अनेक मालमत्ता बळकावल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. ढगे यांनी विशेषत्वाने असा आरोप केला आहे की, खरातने केवळ त्यांची जमीनच हडप केली नाही, तर तो आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्यालाही जबाबदार आहे. या आरोपामुळे परिसरात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर भीषण अपघात! Air Canada Express विमानाची फायर ट्रकला धडक; दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी, VIDEO

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच

कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढणार; इथेनॉल उद्योग २० टक्के मिश्रण पुरवण्यास सज्ज

दक्षिण मुंबईतील शौचालय प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात; महापालिका अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात