पुणे : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, ही संभाव्य युती होणार नसल्याचे शनिवारी अधिकृतरीत्या स्पष्ट झाले आहे. यामुळे पुण्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, कमी जागा आणि 'घड्याळ' चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट यामुळे बोलणी फिस्कटली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीशी अंतर राखणाऱ्या काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या
पक्षांना एकत्र आणून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. समान जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले असले, तरी मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसने आपली नकारघंटा कायम ठेवली आहे.
भाजप-शिंदे गटात तणाव
दुसऱ्या बाजूला भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनेला मिळणाऱ्या वागणुकीविरोधात आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी शुक्रवारी नीलम गोऱ्ह यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून पुण्यात भाजप-सेना युतीत अडचणी येण्याची चिन्हे दिसत आहेत. यातच शनिवारी झालेल्या सेनेच्या अंतर्गत बैठकीत आमदार विजय शिवतारे आणि शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यात खटके उडाले. नाना भानगिरे बैठक सोडून निघून गेल्याने सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नीलम गोऱ्ह यांनी गैरसमज दूर करू, असे सांगितले असले तरी सध्या तणावाचीच स्थिती कायम आहे.
पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी युती?
दरम्यान, पुणे महानगरपालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गटाच्या शिवसेनेसह युती करण्यास सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया सेना नेते रवींद्र धंगेकर यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपकडून मान नको, मात्र कार्यकर्त्यांचा अपमानही नको, अशी भूमिका त्यांनी मांडत कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविल्याचे सांगितले.
जगतापांविरोधात शिवरकर?
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. माजी उपमहापौर व अजित पवार गटाचे नेते दिलीप बराटे, तसेच काँग्रेस नेते अभिजित शिवरकर यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र व माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे. वानवडी प्रभागातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले प्रशांत जगताप यांच्याविरोधात भाजपकडून अभिजित शिवरकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आंदेकर कुटुंबाचा उमेदवारी अर्ज
महापालिका निवडणूक जाहीर होताच आंदेकर कुटुंबीयही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तुरुंगात असलेल्या आंदेकर यांनी न्यायालयात निवडणूक लढवण्यासाठी अर्ज केला होता, तो मंजूर झाल्यानंतर शनिवारी लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला.