कमल मिश्रा/मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येणारा भार लक्षात घेऊन मुंबईत आणखी एक नवे टर्मिनस उभे करण्याचे मध्य रेल्वेने ठरवले आहे. परळहून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यासाठी तेथे नवे टर्मिनस उभे केले जाणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असून तो मंजुरीसाठी लवकरच रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार आहे.
मुंबईत सीएसएमटी, दादर, वांद्रे, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. त्यातील सीएसएमटी स्थानकावर मोठा भार येतो. त्यातच सीएसएमटी रेल्वे स्थानकातून लोकल वाहतूकही सुरू असते. दर पाच मिनिटाला एक गाडी सुटत असते किंवा येत असते. त्यामुळे मध्य रेल्वेला डोळ्यात तेल घालून वेळापत्रक आखावे लागते.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. के. यादव म्हणाले की, प्रस्तावित परळ टर्मिनस सुरू झाल्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आणखी एक पर्याय मिळणार आहे. त्यातून सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील भार कमी होईल. त्यामुळे लोकल सेवा अधिक कार्यक्षमतेने चालवली जाईल.
२०१६ मध्ये पहिल्यांदा परळ येथे टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने तयार केला. तो रेल्वेच्या वित्त विभागाला सादर केला. या प्रकल्पाला रेल्वे कामगारांच्या संघटनेने विरोध केला. त्यानंतर नवीन आराखडा तयार केला गेला. नवीन आराखड्याला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळेल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच कल्याण यार्डाची पुनर्रचनेचे काम वेगाने सुरू करण्याचे मध्य रेल्वेने ठरवले आहे. हे काम पूर्णत्वास गेल्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकाची प्रवासी व्यवस्थापन क्षमता वाढीस लागेल. त्यातून अधिक गाड्यांना तेथे सामावून घेता येईल.
सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील दोन फलाटांच्या विस्ताराचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर तेथून २४ डब्यांच्या गाड्या सामावून घेता येऊ शकतील, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.