महाराष्ट्र

वैभव नाईक यांची डोकेदुखी वाढणार; निलेश राणे शिंदे सेनेच्या वाटेवर

भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असून याबाबत नुकतीच नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली.

Swapnil S

मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असून याबाबत नुकतीच नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. निलेश राणे यांना कुडाळ मालवण येथून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची चर्चा सुरू असून, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची डोकेदुखी वाढणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत अखेर भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी बाजी मारली आणि कोकणात राणे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यातच आता नारायण राणेंनी त्यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे जोरदार फिल्डिंग लावल्याचे समजते. २०१४, २०१९ या दोन सलग निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले निलेश राणे मागील काही महिन्यांपासून पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत.

निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा कोकणसह महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरू लागली आहे. या चर्चेचे कारण म्हणजे भाजप खासदार नारायण राणे यांनी ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट. या भेटीनंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

या मतदारसंघावर निलेश राणे यांच्यासाठी भाजपचा दावा आहे. मात्र, जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून कुडाळ-मालवणचे उमेदवार असतील, असेही सांगण्यात येते.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री