कर्जतमध्ये १०० एकरावर ‘अनंत आश्रय’; अनाथ, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी वसाहत; पाच हजारांसाठी आयुष्यभराचा निवारा (Photo-X)
महाराष्ट्र

कर्जतमध्ये १०० एकरावर ‘अनंत आश्रय’; अनाथ, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी वसाहत; पाच हजारांसाठी आयुष्यभराचा निवारा

अनाथ मुले, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यभर सुरक्षित निवारा, आरोग्यसेवा आणि सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने कर्जत येथे ‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’ ही भव्य वसाहत उभारण्यात येणार आहे.

Swapnil S

कर्जत : अनाथ मुले, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यभर सुरक्षित निवारा, आरोग्यसेवा आणि सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने कर्जत येथे ‘नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय’ ही भव्य वसाहत उभारण्यात येणार आहे. सुमारे १०० एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात पाच हजार रहिवाशांना कायमस्वरूपी निवारा मिळणार आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी रविवारी या प्रकल्पाची घोषणा केली. तसेच कर्जत येथील जागेवर भूमिपूजन करून कामाचा औपचारिक शुभारंभ केला.

हा प्रकल्प कायमस्वरूपी ना-नफा तत्त्वावर चालविण्यात येणार असून, आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याची उभारणी केली जाणार आहे. ‘अनंत आश्रय’ हा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या हृदयाला स्पर्श करणारा प्रकल्प आहे. अनाथ मुले, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना घर, काळजी आणि सुरक्षित निवारा मिळावा, हा यामागील उद्देश आहे. येथे रहिवाशांना वैद्यकीय उपचार, शिक्षण, रोजगार, मैत्री आणि स्वतःला व्यक्त करण्याच्या संधी मिळतील. निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना सन्मानाने आणि आनंदाने जगता येईल, असे नीता अंबानी यांनी सांगितले.

आपल्या पश्चात दिव्यांग मुलांची काळजी कोण घेणार, या चिंतेत असलेल्या पालकांसाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरेल. त्यांच्या मुलांना येथे स्वतःचे घर आणि कुटुंब मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

या वसाहतीचा लाभ परिसरातील नागरिकांनाही मिळणार असून, आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सुमारे १५ हजार लोकांचे एक मोठे कुटुंब येथे वास्तव्यास असेल, असा अंदाज आहे. समाजातील दुर्लक्षित आणि आयुष्यभर काळजीची गरज असलेल्या व्यक्तींना हक्काचे घर, सुरक्षितता आणि सन्मान मिळवून देणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

आरोग्यसेवा, पुनर्वसन आणि रोजगारावर भर

वसाहतीत विशेष रुग्णालय, दंतवैद्यकीय सेवा, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि हायड्रोथेरपी यांसारख्या सुविधा असतील. संगीत, कला, क्रीडा आणि मनोरंजनासाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. बेकरी उत्पादने, हॉटेल व्यवसाय आणि हस्तकला निर्मितीचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. वनतारामधील तज्ज्ञांच्या सहकार्याने प्राणी निवारा केंद्रही विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय परिसरातील गावांसाठी फिरती वैद्यकीय केंद्रे आणि वसतिगृहांची सुविधा असेल. दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमी स्थापन केली जाणार आहे.

आठ निवासी गावे, सर्वसमावेशक सुविधा

या वसाहतीत आठ निवासी गावे असतील. त्यांना देशातील पवित्र नद्यांची नावे दिली जातील. प्रत्येक गावाची स्वतंत्र रंगसंगती, बोधचिन्हे आणि बागा असतील. रहिवाशांना सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे छोट्या घरांमध्ये राहता येईल. त्यांच्या आवडीनुसार खोल्या सजविण्याचीही संधी दिली जाईल. प्रत्येक रहिवाशाच्या गरजेनुसार आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराचा वैयक्तिक आराखडा तयार केला जाईल. त्याचा दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जाणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

इंडिया आघाडीचा पुन्हा एल्गार! ज्ञानेश कुमार नसते तर मोदी पंतप्रधान झालेच नसते : राहुल गांधी; रामलीला मैदानावर SIR विरोधी महारॅली

LPG Price Hike : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर

Mumbai : काजू-अंजीर कतली, बर्फीनेही खाल्ला भाव; खरेदीसाठी आधीच बुकींग

GST संकलनाचा विक्रम; ऑक्टोबरमध्ये २.३१ लाख कोटींचे विक्रमी संकलन

महादेव बेटिंग अ‍ॅपचा सूत्रधार सौरभ चंद्राकरचे भारतात प्रत्यार्पण