सिंधुदुर्ग : नियोजित शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा तयार करताना या महामार्गाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला निश्चितपणे होईल याची काळजी घेण्यात येईल, असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवस या नियोजित महामार्गाच्या आराखड्याबाबत विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत असून या महामार्गाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदा काय, असा सवाल त्यांच्याकडून केला जात आहे.
याला उत्तर देताना पालकमंत्री राणे पुढे म्हणाले, या महामार्गाच्या संदर्भात अनेक बैठका झाल्या असून स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या अनेक सूचनांची दखल घेण्यात आली आहे. या महामार्गाचा फायदा जिल्ह्याला कसा होईल हे पाहिले जाईल. बांदा व इतर गावे बाधित होणार नाहीत त्यातून आम्ही मार्ग काढला असून नवीन मार्ग तयार केला आहे. रेडीलाही हा महामार्ग जोडला जाणार आहे. जिल्ह्याला फायदा होईल अशाच पद्धतीने शक्तिपीठ महामार्ग तयार होईल, असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
संदेश पारकर यांची मागणी दरम्यान नियोजित शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा बदलून हा महामार्ग राधानगरी येथून सिंधुदुर्गात आणावा, अशी जोरदार मागणी नगराध्यक्ष कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली असून याबाबतचे निवेदन त्यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसराच्या जवळून प्रस्तावित महामार्ग जात आहे. हा महामार्ग राधानगरी मार्गे सिंधुदुर्गात आल्यास तो व्यवहार्य ठरेल. राधानगरी ते सिंधुदुर्ग हे अंतर अवघे ३० ते ४० किलोमीटर असल्याने या महामार्गामुळे पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदा होणार आहे, असे ते म्हणाले. या महामार्गाला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६६ ला थेट जोडणी द्यावी किंवा सह्याद्रीच्या पायथ्याशी ग्रीनफिल्ड संकल्पनेनुसार समांतर मार्ग विकसित करून तो कणकवली कुडाळ, सावंतवाडी तालुक्यातून बांदा, पत्रदेवी पर्यंत न्यावा असेही पारकर यांनी सुचवले आहे.
उबाठा सेनेचा विरोध..!
कोकणच्या मुळावर उठणाऱ्या 'शक्तिपीठ' महामार्गाला ठाकरे सेनेचा कडाडून विरोध हा राहणारच त्यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशा इशारा माजी आमदार आणि 'उबाठा' सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिला आहे.