नितेश राणे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

‘हिंदू’च लक्ष्य का? - राणे; मराठी ‘सक्ती’वरून भाजप मंत्र्याची मनसेवर टीका

भाजप नेते व महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी एका ‘हिंदू माणसाला’ मराठीत न बोलल्याच्या कारणावरून मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याच्या घटनेवर आक्षेप घेतला असून ज्यांनी टोपी घातलेली असते, ते काय शुद्ध मराठी बोलतात का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Swapnil S

मुंबई : भाजप नेते व महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी एका ‘हिंदू माणसाला’ मराठीत न बोलल्याच्या कारणावरून मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याच्या घटनेवर आक्षेप घेतला असून ज्यांनी टोपी घातलेली असते, ते काय शुद्ध मराठी बोलतात का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाईंदरमध्ये एका दुकानदाराला मराठीत न बोलल्यामुळे मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर राणे विधानभवनाच्या आवारात बोलत होते.

एका हिंदू माणसाला मारहाण झाली. गरीब हिंदूंवर का हल्ले केले जात आहेत? हिंमत असेल तर न‌ळ बाजार किंवा मोहम्मद अली रोडवर जा आणि तिथे तुमची ताकद दाखवा, असे ते म्हणाले. जावेद अख्तर किंवा आमिर खान मराठीत बोलतात का? त्यांना मराठीत बोलायला लावण्याची तुमच्यात हिंमत नाही. मात्र गरीब हिंदूंवर हल्ला करता, असेही राणे म्हणाले.

मराठी आणि हिंदी याभोवती निर्माण करण्यात आलेला वाद हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राणे यांनी केला.

देशाला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे हे एक कटकारस्थान आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि अशा अनेक माध्यमांतून मुंबईत हिंदूंची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही हिंसा त्या योजनेचाच एक भाग आहे. जर हिंमत असेल तर मालवणी भागात जा आणि तिथे हल्ला करून दाखवा. तिथे लोक शुद्ध मराठी बोलतात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सध्याचे सरकार हे हिंदूंनी निवडून दिलेले आहे आणि हिंदुत्वावर आधारित आहे. कोणीही अशा प्रकारे वागत असेल तर आमचे सरकारही प्रत्युत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. एकीकडे भाईंदरमधील दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असताना दुसरा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यात शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन विचारे यांच्या उपस्थितीत दोन व्यक्तींना एका मराठी व्यक्तीला मारल्याबद्दल माफी मागायला लावले जात आहे. त्यापैकी एकाला बळी पडलेल्या व्यक्तीने चापटही मारली. मराठी माणसाला मारल्यावर मराठीतच बोल, असे त्या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीला सांगितले जात आहे. जेव्हा तो विचारे यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करतो.

राज्यातील शाळांमध्ये पहिल्यापासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाषेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता.

संघर्षाचा अधिकार मनसेलाच आहे का? - प्रताप सरनाईक

राणेंचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनीही मनसेवर टीका करताना म्हटले की, मराठीसाठी संघर्ष करण्याचा अधिकार फक्त मनसेलाच आहे का? कोणी कायदा हातात घेत असेल विशेषतः कामगार वर्गावर राजकीय किंवा आर्थिक हेतूने हल्ला करत असेल तर तो प्रकार सहन केला जाणार नाही, असे सरनाईक म्हणाले. आम्हालाही आमच्या मराठीपणाचा आणि हिंदुत्वाचा अभिमान आहे. अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत. व्यापाऱ्यांना धमकावले जाऊ नये. मी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले होते आणि त्यांनी ती केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?