(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

फक्त काँग्रेसची खाती नाही, तर देशातील लोकशाही गोठवली; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिंमत भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांच्यात नसल्याने ते रडीचा डाव खेळत आहेत. पराभवाच्या भयाने घाबरलेले मोदी यांनी तपास संस्थांना हाताशी धरून विरोधी पक्षांना संपवण्याचे कारस्थान सुरू केले आहे. काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवता येऊ नये म्हणून काँग्रेस पक्षाची खाती गोठवली आहेत. मोदी सरकारने फक्त काँग्रेसची खाती नाही तर या देशातील लोकशाही गोठवली आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली, तोही मोदी सरकारच्या कारस्थानाचा एक भाग असल्याचा दावाही त्यांनी केला.

केंद्रातील भाजप सरकार चीन व रशियाच्या मॉडेलनुसार काम करत असून त्यांना देशात फक्त एकच पक्ष हवा आहे त्यांच्या या मॉडेलमध्ये विरोधी पक्षाला स्थानच नाही म्हणून ते विरोधी पक्षांना संपवण्यासाठी ते आपली पूर्ण ताकद लावून संविधानिक संस्था आणि तपासयंत्रणांचा गैरवापर करत आहेत, असे पटोले म्हणाले.

भाजपचा कार्यकर्ता असलेल्या प्राप्तिकर विभागाने काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवून काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा कपटी डाव खेळला आहे. भारतीय जनता पक्षासह कोणताही राजकीय पक्ष प्राप्तिकर भरत नाही. असे असताना फक्त काँग्रेस पक्षावरच प्राप्तिकर विभागाने कारवाई करून ११ बँक खाती का गोठवली? काँग्रेसवर जशी कारवाई केली तशी भारतीय जनता पक्षावर कारवाई करण्याची हिम्मत या इन्कम टॅक्स विभागाने का दाखवली नाही? २०१७-१८ साली काँग्रेस पक्षाला मिळालेल्या २१० कोटी देणग्यांचा मुद्दा आहे. काँग्रेस खासदारांनी पक्षाला १४ लाख ४९ हजार रुपये रोख दिले आहेत, हे कारण दाखवून इन्कम टॅक्स विभागाने १०६ टक्के दंड लावून काँग्रेस पक्षाच्या खात्यातून ११५ कोटी रुपये जबरदस्तीने काढून घेतले आहेत. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे.. टायमिंग.. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाला पुढे करून काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवून आर्थिक कोंडी केली आहे. पक्षाकडे निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पैसे नाहीत. सीताराम केसरी काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते त्यावेळच्या देणग्यासाठी आता ३१ वर्षानंतर प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवली आहे. राजकीय पक्ष प्राप्तिकर कक्षेत येत नाहीत हे मोदींना माहित आहे. भाजपने कधी प्राप्तिकर भरला आहे का? असा सवाल करून मोदी सरकार किती खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहे हे दिसते, काँग्रेस पक्ष याप्रश्नी कोर्टात जाईल पण तोपर्यंत लोकसभा निवडणुका संपतील, असे पटोले म्हणाले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल