मुंबई : सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, असा अंदाज ‘टीव्ही-९’च्या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे, तर ‘एबीपी-सी वोटर’च्या सर्व्हेत महायुतीला ३० व मविआला १८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या निवडणुकीत मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीत अजित पवार गट भुईसपाट, तर एकनाथ शिंदे यांनाही या निवडणुकीत जबर फटका बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ तीन जागा मिळतील, असा अंदाज आहे.
राज्यात भाजपला २५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १०, काँग्रेसला ५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ५ जागा, तर एकनाथ शिंदे गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागेल, तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज आहे.
महाराष्ट्रात ‘एनडीए’ला ४०.२२ टक्के, तर इंडिया आघाडीला ४०.९७ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. संभाजीनगरची जागा महायुती, धुळे लोकसभेची जागा भाजप, तर लातूरची जागा काँग्रेस जिंकू शकते. मुंबई उत्तर लोकसभेतून निवडणुकीच्या मैदानात असलेले पियूष गोयल यांचाही विजय होण्याची शक्यता आहे, तर मावळमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय होऊ शकतो. तसेच बारामतीची जागा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे जिंकण्याची शक्यता आहे.
एबीपी-सीवोटरचा सर्व्हेत महायुती ३०, मविआ १८ जागा
येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला ३०, तर मविआला १८ जागा मिळण्याचा अंदाज एबीपी-सीवोटरच्या सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे. भाजपला एकूण २१ ते २२ जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ९ ते १० जागा मिळू शकतात, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ९ जागांवर विजयाची शक्यता आहे. काँग्रेसला ३ जागा व राष्ट्रवादी शरद पवार गटाला ५ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
६४ टक्के मतदारांना पंतप्रधानपदी हवेत मोदी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रस्ट ऑफ नेशन’च्या सर्वेक्षणात नरेंद्र मोदींनी पुन्हा बाजी मारली आहे. सर्वेक्षणात ६४ टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले आहे. या सर्वेक्षणाचा निकाल लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘डेली हंट सर्व्हे’त मांडला आहे. ‘डेली हंट’ने लोकसभा निवडणूक २०२४ च्या सर्वेक्षणात एकूण ७७ लाख लोकांची मते जाणून घेतली. सर्वेक्षणाचे जे निकाल समोर आले आहेत ते सध्या मोदी सरकारच्या बाजूने आहेत. ६१ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे. यावेळीही लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळेल असा ६३ टक्के लोकांचा विश्वास असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. फक्त २१.८ टक्के लोकांना राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे. महायुती लोकसभा निवडणूक जिंकेल, असा विश्वास सर्वेक्षणातून समोर आला आहे.