महाराष्ट्र

पद्मभूषण सई परांजपे यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार; १० व्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

सांस्कृतिक आणि कला विषयक उपक्रम केवळ पुणे - मुंबईतच घडू शकतात असे नाही, हे अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने दाखवून दिले आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : सांस्कृतिक आणि कला विषयक उपक्रम केवळ पुणे - मुंबईतच घडू शकतात असे नाही, हे अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने दाखवून दिले आहे. विशेषत : मराठवाड्यातील तरुणाईला सिने साक्षर करण्याचे काम या महोत्सवाने केले असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण सई परांजपे यांनी यावेळी केले.

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द व ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या व चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पैठणीचा शेला, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि २ लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी, पद्मभूषण सई परांजपे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

पुढे बोलताना पद्मभूषण सई परांजपे म्हणाल्या, आज इथे बोलत असताना नित्याचं साचेबंद वक्तव्य टाळून मी एवढेच म्हणते की, आजवर मी केलेल्या कामाची उशिरा का होईना पण दखल घेतली आणि आज मला हा मोठा आणि सुंदर असा ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ सन्मान देऊन केला, त्याचा मी अतिशय आनंदाने आणि नम्रपणे स्वीकार करते. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एका वेगळ्या धारणेने सुरू झालेला असून मराठवाड्यामधल्या रसिकाला खास आपला वाटेल असा हा उत्सव आहे.

आनंदाची गोष्ट अशी की गेल्या वीस वर्षामध्ये मराठी सिनेमाला उभारी आली असून आज वर्षाला किमान ५०-६० मराठी चित्रपट जन्माला येतात. आणि विशेष म्हणजे त्यातील अनेक सिनेमे शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या मातीमधून निपजतात. होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ, खासगी व्यथा, सामाजिक पोटतिडीक अशा जाणिवामधून यातल्या बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो. पण या सिनेमंडीमधून नानाविध विषयांना वाचा फुटली असल्याचे पद्मभूषण सई परांजपे म्हणाल्या. यावेळी अप्पर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले, चित्रपट हे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्ट पॉवर म्हणून सिनेमा काम करत असतो. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहेत, ही निश्चितपणे आनंदाची बाब आहे. चित्रपट बनविणाऱ्या मंडळींना महाराष्ट्र शासन कायम सहकार्य करीत आले असून अनेक प्रोत्साहानपर योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. \

LPGची टंचाई नाही! छगन भुजबळ यांची विधानसभेत माहिती; राज्यात इंधन पुरवठा सुरळीत

पाकिस्तानचा काबूलवर हवाई हल्ला; ४०० ठार, २५० जखमी, बदला घेण्याचा अफगाणिस्तानचा इशारा, हल्ला अमानुष - भारताची प्रतिक्रिया

जिल्हा परिषद, पंचायत समितीत स्वीकृत सदस्य विधेयक मंजूर; सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा राहणार

अमेरिकेत अंतर्गत धुसफूस; ‘इराणकडून धोका नव्हता’ असे सांगत अमेरिकेच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखाचा राजीनामा

LPG घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल