

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी आपल्या व्हॉट्सॲप चॅटबॉटवर स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांना ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर मेसेज पाठवून तक्रार दाखल करता येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
'मायबीएमसी मार्ग' तक्रार निवारण ॲपची सुरुवात
नागरिकांच्या तक्रारींचे विविध विभागांमध्ये प्रभावी व्यवस्थापन आणि निवारण करण्याच्या उद्देशाने बीएमसीने नुकतेच 'मायबीएमसी मार्ग' (मॅनेजमेंट अँड रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्सेस) हे तक्रार निवारण ॲप सुरू केले आहे.
फेरीवाल्यांविरोधातील तक्रारींसाठी स्वतंत्र पर्याय
यापूर्वीही नागरिक १९१६ हेल्पलाइन, सोशल मीडिया माध्यमे आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून रस्त्यांवरील खड्डे तसेच इतर नागरी समस्यांबाबत तक्रारी नोंदवत होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नव्याने सुरू करण्यात आलेली ही सुविधा विशेषतः अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील तक्रारींसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय?
तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना व्हॉट्सॲप चॅटबॉटवरील 'अनधिकृत फेरीविक्री' (Illegal Hawking) हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर संबंधित ठिकाणाची माहिती देऊन उल्लंघनाचा प्रत्यक्ष फोटोही अपलोड करता येणार आहे.
जलद कारवाईस मदत होण्याची अपेक्षा
या सुविधेमुळे शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील तक्रारींची नोंद, त्यावर देखरेख आणि कारवाई अधिक जलद व प्रभावीपणे करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.