मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी निंदा केली. काही पक्ष व त्यांचे कार्यकर्ते हे अशा स्थितीत राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही राज्यपालांनी म्हटले आहे.
पहलगाममधील भीषण हल्ल्यावर भारतीय विरोधी नेत्यांच्या वक्तव्यांचा पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी उल्लेख केल्यावर पीटीआय (व्हिडीओज्) ला राज्यपालांनी सांगितले की, काही पक्ष आणि नेते या भयंकर घटनेतून राजकीय फायदा मिळवू पाहत आहेत. अशा गंभीर मुद्द्यावर अशी विधाने होणे दुर्दैवी आहे.
भारतात अशांतता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा हेतू आहे आणि त्यामुळे त्याच्याशी कठोरपणे वागणे आवश्यक आहे. देशात अशांतता निर्माण करायची त्यांची इच्छा आहे. पाकिस्तान हे सातत्याने करत आहे. पाकिस्तानने त्याच्या निर्मितीपासून काहीच धडे घेतलेले नाहीत. पाकिस्तानशी कठोरपणे वागणे आवश्यक आहे, असे राधाकृष्णन यांनी सांगितले. पाकिस्तान या दुर्दैवी घटनेतून प्रचाराचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यात यश येणार नाही. कारण संपूर्ण भारत देश एकवटला आहे, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणार - शिंदे
दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सर्वच स्तरातून दहशतवाद्यांविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. पहलगाम येथील हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला नष्ट करावे, अशी सर्व देशवासीयांची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून खून का बदला खून, इट का जवाब पत्थर से अशा पद्धतीने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले जाईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आहे.