विठु दर्शनाची लागे मज आस! कार्तिकी यात्रेसाठी गजबजली अवघी पंढरी; ४ लाख भाविकांची मांदियाळी, गोपाळपूरच्या पुढे दर्शन रांग  छायाचित्रे : सोशल मीडिया
महाराष्ट्र

विठु दर्शनाची लागे मज आस! कार्तिकी यात्रेसाठी गजबजली अवघी पंढरी; ४ लाख भाविकांची मांदियाळी, गोपाळपूरच्या पुढे दर्शन रांग

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत कार्तिकी यात्रेचा उत्साह सळसळू लागला आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत.

प्रतिनिधी

सूर्यकांत आसबे /सोलापूर

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत कार्तिकी यात्रेचा उत्साह सळसळू लागला आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. यात्रेसाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे ४ लाख भाविक दाखल झाल्याने मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख रस्ते, मठ, धर्मशाळा आणि भक्तनिवास गजबजले आहेत.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढल्याने दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे पोहोचली आहे. 'विठ्ठल-विठ्ठल', 'ज्ञानोबा-तुकाराम' आणि 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल' अशा जयघोषाने चंद्रभागेचा परिसर दुमदुमून गेला आहे. अनेक भाविक कुटुंबासह पंढरीत दाखल झाले असून, चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा आणि विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू आहे.

शिंदे सपत्निक करणार शासकीय महापूजा

कार्तिकी शुद्ध एकादशीचा मुख्य धार्मिक सोहळा आज, शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करणार आहेत. पहाटे २ वाजून २० मिनिटांनी हा पूजाविधी पार पडेल, अशी माहिती मंदिर समितीने दिली. यावेळी मानाच्या वारकरी दाम्पत्यालाही महापूजेचा मान मिळणार आहे.

भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाकडून व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेत पत्राशेड उभारण्यात आले असून, पिण्याचे शुद्ध पाणी, चहा, नाश्ता, विश्रांतीची ठिकाणे, पंखे, कुलर आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सुमारे दोन हजार कर्मचारी आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर आणि आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. चंद्रभागा नदीच्या घाटांवर जीवरक्षक आणि आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.

विठ्ठलनामाच्या गजराने पंढरी दुमदुमली

कार्तिकी यात्रेमुळे पंढरपूरमध्ये सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात भजन, कीर्तन, प्रवचन आणि हरिनाम सप्ताहांचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायातील भाविक टाळ-मृदंगाच्या गजरात विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करत आहेत.यंदा कार्तिकी यात्रेला मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला असून, मुख्य एकादशीच्या दिवशी गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात घेऊन आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीने पंढरी नगरीला जणू भक्तीचा महासागर फुलला आहे.

पदस्पर्श दर्शनासाठी १२ तास

कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या तसेच खासगी वाहनांमधून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. सुमारे दीड लाखांहून अधिक भाविक तंबू आणि राहुट्यांमध्ये मुक्कामाला आहेत. रिद्धी-सिद्धी दर्शन मंडप परिसरात कायमस्वरूपी दर्शन हॉलचे बांधकाम सुरू असल्यामुळे गोपाळपूर-स्वेरी कॉलेज रस्त्यावरील खासगी जागेत तात्पुरत्या स्वरूपात १५ पत्राशेड उभारून भाविकांना दर्शन रांगेची व्यवस्था करून देण्यात आली आहे. पदस्पर्श दर्शनासाठी दहा ते बारा तासांचा अवधी लागत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आंबेडकर स्मारक रखडले; खर्च वाढल्याने ३५० कोटींचा प्रस्ताव प्रलंबित; प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा विलंब होण्याची शक्यता

नागपूरचे नाव 'दीक्षाभूमी' करा - उद्धव ठाकरे

Mumbai : बेस्टचा 'कायापालट'; कंत्राटी गाड्यांना आता पूर्णविराम, दहा वर्षांनंतर बेस्ट पुन्हा स्व-मालकीच्या बसखरेदीकडे

Tulsi Vivah 2026 : तुळशीचं लग्न लावताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या शुभमुहूर्त अन् पूजा विधी

संवैधानिक मूल्यांनाच आव्हान