नाशिक : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र गोळा केले तर एक वेगळा पक्ष उभा राहील, असे वक्तव्य मुंडे यांची कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा असतील, असे शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, तर स्वतंत्र पक्ष कोणीही काढू शकते. पंकजाताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल. पण माझे म्हणणे असे आहे की, एका समाजावर पक्ष काढणे आणि त्यामध्ये यश मिळवणे, हे कितपत यशदायी आहे याची मला कल्पना नाही. मग तो कुठलाही समाज असो, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले.
नाशिक येथे आयोजित वारकरी भवनातील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये वेगळा पक्ष उभा करण्याची ताकद आहे. फक्त तेच गोळा केले तर वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो, असे म्हटले होते. त्यावर आधी संजय राऊत आणि आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी केलेले वक्तव्य हा भाजपला सूचक इशारा आहे का, अशा चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
मुंडे साहेबांबद्दल बोलायचे झाले तर एक गोष्ट सांगू शकतो. २००२ ची गोष्ट असेल, मी उपमुख्यमंत्री होतो. गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि म्हणाले, एक वेगळा पक्ष काढू. तुम्ही, मी आणि गणपतराव देशमुख, आठवले एक पक्ष काढू. पक्ष चांगल्या रीतीने पुढे जाईल, मी उपमुख्यमंत्री होतो म्हटले मला राजीनामा द्यावा लागेल. ते उपनेते होते, त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असेही सांगितले. मी सांगितले, माझी काही हरकत नाही. इतर लहान घटकांना घेऊन पक्ष निघत असेल तर हरकत नाही, असेही म्हटले. पण नंतर त्यांनी तो विषय सोडून दिला, अशी आठवण छगन भुजबळांनी सांगितली.
मुंडेंना मानणारा वर्ग मोठा
आपल्यापुढे अशी कित्येक उदाहरणे आहेत. काही समाजाने, घटकाने वेगवेगळे पक्ष काढले, ते कितपत चालले, त्यांना कितपत यश मिळाले, याचा लेखाजोगा त्यांनी घ्यावा, असा इशारा भुजबळांनी दिला. पण त्यांनी (पंकजा मुंडे) त्याचा अभ्यास केला असेल. मात्र त्यांनी असे म्हटले म्हणून त्या काही पक्ष काढतील, असे काही मला वाटत नाही. स्व. मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे, एवढाच अर्थ त्याचा आहे, असे मला वाटते, असे भुजबळांनी नमूद केले.