नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज्ञेवरून आपल्याला लक्ष्य केल्याचा आरोप सोमवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केला. परमबीर सिंह यांना अटकेपासून वाचविण्यासाठी फडणवीस यांनी, माजी पोलीस आयुक्तांना आपल्याविरुद्ध आरोप करण्यास सांगितले आणि त्याद्वारे फडणवीस यांना महाविकास आघाडी सरकार उलथून टाकावयाचे होते, असा दावाही देशमुख यांनी केला. दरम्यान, देशमुख यांनी केलेला दावा धादांत खोटा असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
बार आणि हॉटेल मालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य देशमुख यांनी आपल्याला दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. फडणवीस यांच्या आज्ञेवरूनच वाझे याने आपल्यावर आरोप केल्याचा दावाही देशमुख यांनी केला.
परमबीर सिंह आणि वाझे यांची नियुक्ती देशमुख गृहमंत्री असतानाच करण्यात आली होती, असे देशमुख यांना विचारण्यात आले. तेव्हा देशमुख म्हणाले की, मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील वाहनात बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणात परमबीर सिंह हेच सूत्रधार असल्याचे चौकशीतून बाहेर आले. सिंह यांना तीन वर्षांपूर्वीच अटक झाली असती, मात्र अटक टाळण्यासाठी सिंह हे फडणवीस आणि केंद्र सरकारला शरण गेले, असा आरोप देशमुख यांनी केला.
न्या. चांदीवाल आयोगाच्या अहवालात आपल्याला क्लीनचिट देण्यात आली आहे, असे सांगून देशमुख यांनी फडणवीस यांना आयोगाचा अहवाल जाहीर करण्याचे आव्हान दिले. तथापि, महाविकास आघाडी सत्तेवर असतानाच अहवाल सादर करण्यात आला होता. त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
न्या. चांदीवाल अहवाल फडणवीसांनी दाबून ठेवला
महाविकास आघाडीच्या राजवटीत न्या. चांदीवाल अहवाल सादर करण्यात आला होता हे सत्य असले तरी अहवाल जाहीर होण्यापूर्वी ४० आमदारांना ५० कोटी रुपये देऊन देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडले. त्यामुळे सरकारला अहवाल सादर करता आला नाही, असा पलटवार अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यानंतर महायुतीचे सरकार आले आणि फडणवीस यांनी अहवाल दोन वर्षांपासून दाबून ठेवला आहे, असे ते म्हणाले.
झूठ बोले कौवा काटे...
देशमुख यांनी केलेल्या आरोपाबाबत फडणवीस यांना विचारले असता त्यांनी, ‘झूठ बोले कौवा काटे-काले कौवे से डरियो’, एवढीच प्रतिक्रिया दिली आणि अन्य भाष्य करण्यास नकार दिला.