मुंबई : पुण्यातील मुंढवा येथील घोटाळ्यातील जमिनीचा व्यवहार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रद्द केल्याचे जाहीर केले आहे. आता त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कायद्यावर बोट ठेवत जमिनीचा अधिकार नसताना व्यवहार रद्द करण्याचा अधिकारच नसल्याचे सांगत पार्थ पवारसह अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दमानिया यांनी मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. ‘मेघदूत’ बंगल्यावर दमानिया व बावनकुळे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, सार्वजनिक मालकीची जमीन असल्याने तिचा व्यवहार करण्याचे अधिकार सरकारकडे आहेत. त्यामुळे या जमीन व्यवहारात अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना निष्पक्ष चौकशी होईल का? असा सवाल दमानिया यांनी केला.
या जमीन व्यवहारात अमेडिया एंटरप्रायझेसचा थेट सहभाग आहे, मात्र, त्यांना हा व्यवहार रद्द करण्याचा अधिकारच नाही, असे सांगत दमानिया म्हणाल्या की, ‘हा व्यवहार रद्द ना अजित पवार करू शकतात, ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते, ना शितल तेजवानी करू शकते. कारण ते रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाहीत. कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाहीत’.
पार्थ पवार यांच्यावर गुन्हा नोंदवा!
सध्याच्या गुन्ह्यामध्ये कंपनीचे आणि पार्थ पवार यांचे नाव नाही. त्यामुळे दमानिया यांनी मागणी केली की, ‘सध्या जो गुन्हा आहे त्यात अमेडिया एंटरप्राइजेसचे नाव नाही, याचाच अर्थ पार्थ अजित पवार यांचे नाव नाही. हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत. पार्थ पवार आणि अमेडियावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे.
सिंचन घोटाळ्याविरोधात न्यायालयात दाद मागणार
‘मी सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा बाहेर काढणार आहे. तसेच अजित पवारांच्या आजवरच्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे’, असा इशारा दमानिया यांनी दिला.
अजित पवारांशी संबंधित व्यवहार उघड करणार!
अंजली दमानिया यांनी सांगितले की, अजित पवारांशी संबंधित कंपन्यांच्या इतर व्यवहारांची मालिका उघड करण्याचे ठरवले आहे. अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्या जमिनीचे किती व्यवहार झालेत हे सगळे मी हळूहळू काढणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.