पेण (Pen) तालुक्यातील डोलवी गावात असलेल्या जेएसडब्ल्यू (JSW) या कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका खारमाचेला येथील शेतकरी आणि मच्छीमारांना बसला. या कंपनीने गडब खारमाचेला येथील खाडीचे नैसर्गिक नाले बुजवून तेथे पाईप टाकून त्याला सिमेंटचा मुलामा दिल्याने येथील शेतकरी आणि मच्छीमार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खाडीचे पाणी रोखल्याने येथील शेती सुखी ठाक पडली आहे, तर खाडीमध्ये जाण्याचा रस्ता बंद केल्याने येथील छोट्या मच्छीमारांना मासेमारी करता येत नाही. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीने २६ डिसेंबरच्या पूर्वी सदरील पाईप काढून नैसर्गिक नाला पूर्ववत न केल्यास येथील शेतकरी आणि मच्छीमारांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा कंपनी प्रशासन आणि शासनाला दिला आहे
पेण तालुक्यातील गडब गावातील खाडीकिनारी असलेल्या खारमाचेला सर्व्हे क्र. ९४ येथे गावाकडून धरमतर खाडीच्या दिशेने जाणारा नैसर्गिक नाला पूर्वापार आहे. मात्र या नाल्याचा मार्ग जेएसडब्ल्यु कंपनीने भराव करून बांध घालुन चार सिमेंटचे पाईप टाकून बंद केला. येथील सर्व जमिनी पूर्णपणे नापीक करण्यात कंपनी प्रशासन यशस्वी झाली आहे. २०१४ साली तात्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांच्या आदेशाने सदरील पाईप काढून टाकण्यात आले होते. तसेच कंपनीच्या या कामाला खारभूमी अभियंत्यांनीही विरोध केला होता. त्यांच्याही आदेशाला कंपनी प्रशासनाने केराची टोपली दाखवत बेकायदेशीरपणे चुकीच्या पद्धतीने खाडीतील उघाडी बंद करण्यास सुरुवात केली. सदर कामास वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नानवर यांनी सुमारे २० पोलीस अधिकाऱ्यांची सुरक्षा कंपनीला दिली होती. सदर कामास स्थानिक शेतकऱ्यांनी शांतपणे व अहिंसक मार्गाने विरोध ही दर्शवला होता. मात्र पोलिसांनी आंदोलकांना धक्काबुकी करून जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन कंपनी प्रशासनाला बेकायदेशीर उघाडी बांधून दिली, असे 'श्री बापदेव शेतकरी मंडळा'चे अध्यक्ष सुनील कोटेकर यांनी पत्रकारांना सांगितले.
परिणामी शेतीमध्ये येणार पाणी बंद झाले व त्यावर चालणारी मच्छीमारी ही बंद झाल्याने 'श्री बापदेव शेतकरी मंडळा'चे २० ते २५ शेतकरी, येत्या २६ डिसेंबर रोजी पेण उपविभागीय कार्यालयात सामूहिक आत्मदहन करण्याचा लेखी इशारा दिला. यावेळी जर आम्हाला प्रशासनाने अडवले तर आम्ही आमच्या राहत्या घरी ही आत्मदहन करू शकतो, असाही इशारा कंपनी प्रशासन आणि सरकारला यावेळी 'श्री बापदेव शेतकरी मंडळा'च्या शेतकऱ्यांनी दिला. यावेळी 'श्री बापदेव शेतकरी मंडळा'तर्फे अध्यक्ष सुनिल कोठेकर, सुभाष कोठेकर, काशिनाथ कोठेकर, दिलीप कोठेकर, लहू कोठेकर, प्रविण म्हात्रे, महेंद्र कोठेकर, सचिन कोठेकर, इत्यादी शेतक-यांनी पत्रकार परिषदेत आत्मदहन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. याची सर्वस्वी जबाबदारी खारलॅंड अधिकारी प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांच्यावर राहील, असेही यावेळी या शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.