महाराष्ट्र

Pune Metro : पावसामुळे पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द झाल्याने स्वारगेटपर्यंत मेट्रो पोहोचण्याच्या मार्गालाही 'ब्रेक'!

पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याने स्वारगेटपर्यंत मेट्रोने प्रवास करण्याची आस बाळगून असलेल्या प्रवाशांचा हिरमोड झाला.

Swapnil S

पुणे : मागील दोन दिवसांपासून पुण्यात होत असलेला मुसळधार पाऊस, बुधवारी झालेली अतिवृष्टी व गुरुवारी देण्यात आलेला रेड ॲलर्ट या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरूवारचा पुणे दौरा अखेर रद्द करण्यात आला. पण, त्यामुळे स्वारगेटपर्यंत मेट्रो पोहोचण्याच्या मार्गालाही ब्रेक लागला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. यात पुण्यातील मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनासह बारा प्रकल्पांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचा समावेश होता. तसेच पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभाही होणार होती. त्या दृष्टीने प्रशासनामार्फत जय्यत तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून शहरात होत असलेल्या पावसाने मैदानावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता.

त्या पार्श्वभूमीवर मैदानावर खडी टाकून सव्वा फुटाचा लाकडी प्लॅटफॉर्मदेखील तयार करण्याचे काम सुरू होते. तथापि, पावसाचा सुरू असलेला ओघ व हवामान विभागामार्फत देण्यात आलेल्या रेड अलर्टच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनामार्फत दुसरा पर्याय म्हणून स्वारगेट मेट्रो स्टेशनजवळील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कार्यक्रमाची तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्या ठिकाणी कार्यक्रम होणार, याबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नव्हती. अखेर हा कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.

हा दौरा रद्द झाल्याने स्वारगेटपर्यंत मेट्रोने प्रवास करण्याची आस बाळगून असलेल्या प्रवाशांचा हिरमोड झाला. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो सेवा सध्या कार्यान्वित नसेल, असे पुणे मेट्रोच्या वतीने सोशल मीडियावर सांगण्यात आल्यानंतर अनेकजण त्या पोस्टखाली टीका करीत आहेत. आता पुन्हा पंतप्रधान उद्घाटनासाठी येईपर्यंत सेवा सुरू होणार नाही का, असा सवाल नेटकरी विचारत आहेत. दरम्यान, प्रवाशांना या सेवेसाठी आता आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी