(Photo-X/@RajThackeray)
महाराष्ट्र

"मोठा भाऊ गमावला..." ; अजित पवारांच्या निधनाने राज्यात शोककळा; राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रात शोककळा पसरली असून अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (दि.२८) सकाळी विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील ५ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रात शोककळा पसरली असून अनेक राजकीय नेत्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मनाला चटका लावणारी घटना

"दादा गेले! जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत."
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट

मोठा भाऊ गमावल्याचं दुःख

"अजितदादा माझ्यापेक्षा वयाने मोठे होते आणि राजकारणातील अनुभवानेही. एक उमदा सहकारी आणि त्यापलीकडे एक मोठा भाऊ गमावल्याचं मला दुःख आहे. करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते. चूक दाखवण्याची, प्रसंगी कानउघाडणी करण्याची हिंमत त्यांच्यात होती. ओठात एक आणि पोटात एक असा अजितदादांचा स्वभावच नव्हता. बोलायला रोखठोक परंतु मनाने अतिशय निर्मळ असलेला हा नेता होता. कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची ओळख होती. सामान्य माणसाला ते आपले वाटत असत.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांची पोस्ट

त्यांच्या राजकारणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं...

अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो. अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकारणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष

राज ठाकरेंची पोस्ट

अत्यंत दुःखद आणि काळा दिवस

आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि काळा दिवस ठरला आहे. अजितदादांचे असे आकस्मिक जाणे ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मात्र त्यांचे विचार, कार्य आणि सर्वसामान्य जनतेसाठीचे अमूल्य योगदान सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.
सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

सुनील तटकरे यांची पोस्ट

अजित दादांच्या जाण्याने मनाला चटका

दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती!! ... तुम्ही जीवाला चटका लावून गेलात... तुम्ही सदैव स्मरणात रहाल.. तुमच्याबरोबर प्रवास केला, चर्चा केल्या, अगदी गप्पाही खूप मारल्या.. तुमचा राजकीय आणि ॲकॅडमिक सेन्स खूप जबरदस्त होता. तुमच्या भाषणातून, विनोद बुद्धीने तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं.. पण आज तुमच्या जाण्याने तुम्ही कार्यकर्त्यांना रडवलं..असा अनुभवी नेता होणे नाही .. महाराष्ट्र एका डायनॅमिक नेत्याला मुकला.. गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे आदरांजली.
पंकजा मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री

पंकजा मुंडे यांची पोस्ट

कार्यकर्त्यांना जपणारा नेता

महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!
उद्धव ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख

उद्धव ठाकरेंची पोस्ट

राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी

महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच अशा प्रकारे अजित दादांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान कधीही भरून निघणार नाही.
जयंत पाटील, आमदार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)

जयंत पाटील यांची पोस्ट

माझे दादा मला पोरका करून गेले...

आज पुन्हा पोरका झालो... माझे दादा मला पोरका करून गेले... माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझं आणि दादांचं नातं शब्दात सांगू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता; वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले...
धनंजय मुंडे, आमदार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

धनंजय मुंडे यांची पोस्ट

जे नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही...

अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.
शरद पवार, ज्येष्ठ नेते

शरद पवार यांचा माध्यमांशी संवाद

अजित दादा पंचतत्त्वात विलीन! शोकाकूल वातावरणात पार्थ आणि जय पवारांनी दिला मुखाग्नी; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

"दादांना म्हणालो होतो रात्रीच कारने जाऊ, पण..."; अजित पवारांच्या चालकाला 'त्या' रात्रीची आठवण सांगताना अश्रू अनावर

Ajit Pawar death : अपघाताची बातमी दादांच्या आईने पाहिली तेव्हा..."मला दादांना भेटायचे आहे!"

'दादा'ला I Love You सांग...; अजित पवारांवर अंत्यसंस्कारापूर्वी बारामती मेडिकल कॉलेजबाहेर कार्यकर्त्याने फोडला हंबरडा, भावूक Video

एका चुकीबद्दल अन्नपाण्याविना केला होता आत्मक्लेश; यशवंतरावांचे स्मृतिस्थळ होते अजितदादांचे शक्तिस्थळ!