महाराष्ट्र

बेताल वक्तव्यावरून वाद; पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून नोंदविला आक्षेप

महाराष्ट्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील आणि त्यांच्या आई-वडिलांबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे विरोधकांत नाराजी उसळली असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपला आक्षेप नोंदवला.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील आणि त्यांच्या आई-वडिलांबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे विरोधकांत नाराजी उसळली असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपला आक्षेप नोंदवला.

पडळकर यांनी सांगलीतील जत मतदारसंघातील एका सभेत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत पडळकरांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी सांगलीतील इश्वरपूर (माजी इस्लामपूर) तसेच ठाण्यात आंदोलन केले. ठाण्यात पडळकरांचा पुतळा जाळण्यात आला.

जयंत पाटील हे माजी राज्याध्यक्ष असून अनेक वर्षे मंत्रिपद भूषविले आहे. ते दिवंगत राजाराम पाटील यांचे सुपुत्र आहेत. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे अग्रणी होते. कोल्हापूर दौऱ्‍यावर असलेले शरद पवार यांनी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

अशा प्रकारची वक्तव्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारी नाहीत. प्रगतिशील विचारांना आधार देणारा महाराष्ट्र अशा वक्तव्यांना कधीच मान्यता देऊ शकत नाही, असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

इश्वरपूर येथे झालेल्या आंदोलनानंतर ठाण्यातील निदर्शनांचे नेतृत्व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. त्यांनी भाजप आमदाराविरोधात घोषणाबाजी केली व पुतळा जाळला.

मीही पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. पडळकर तरुण आणि आक्रमक आहेत. अनेकदा त्यांना आपल्या वक्तव्यांचे परिणाम कसे होतील हे लक्षात येत नाही. मी त्यांच्याशी बोललो असून संयम बाळगण्यास सांगितले. सकाळी शरद पवारांनी मला फोनवर जे सांगितले तेही मी मान्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पडळकर यांना कोण पाठीशी घालतंय - वडेट्टीवार

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. पडळकर यांनी जी टीका केली त्यात आईला शिवी दिली आहे. राजकीय पुढाऱ्यांवर टीका करा पण त्यांच्या आई वडिलांवर बोलणे, अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदा घडत आहे. पडळकर कुणाच्या इशाऱ्यावर बोलत आहेत, कोण त्यांना पाठीशी घालत आहे, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

बेलगामपणाचा कळस - हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पूर्वी सुसंस्कृत, सभ्य, विचारवंत व कवी पदरी असायचे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही विकृत लोक पदरी ठेवले आहेत. जयंत पाटील यांच्याबद्दल केलेले विधान हे बेलगामपणाचा कळस असल्याचे सपकाळ म्हणाले.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली

पाक लष्कराचा स्वतःच्याच नागरिकांवर हवाई हल्ला; खैबर पख्तूनख्वात ३० जणांचा बळी

आता नोकरी मिळवणे होणार सोपे! केंद्र सरकार तयार करतेय ‘डॅशबोर्ड’

मतदार यादी सखोल परीक्षणासाठी सज्ज व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश