Satara : ‘कोयने’तील वीजनिर्मितीला मर्यादा; धरणात केवळ ९.३६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा 
महाराष्ट्र

Satara : ‘कोयने’तील वीजनिर्मितीला मर्यादा; धरणात केवळ ९.३६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

पावसाळा सुरू होऊनही पावसाने हुलकावणी दिल्याने आणि उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील कोयना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे.

रामभाऊ जगताप

रामभाऊ जगताप/कराड

पावसाळा सुरू होऊनही पावसाने हुलकावणी दिल्याने आणि उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील कोयना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पायथा वीजगृहातील दोनपैकी केवळ एका युनिटद्वारे वीजनिर्मिती सुरू ठेवण्यात आली असून, त्यातून १ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आल्या असून, पावसाने अशीच पाठ फिरविल्यास नजीकच्या काळात वीज भारनियमनाचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पावसाळ्याची सुरुवात ७ जूनपासून सुरू होणाऱ्या मृग नक्षत्रापासून मानली जात असली, तरी अद्याप पावसाऐवजी उन्हाचीच तीव्रता वाढत आहे. त्यामुळे कोयना धरणातील छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या धरणात १४.४८ टीएमसी (१३.७६ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, त्यापैकी ५ टीएमसी मृत पाणीसाठा वजा जाता केवळ ९.३६ टीएमसी (९.३४ टक्के) एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने पायथा वीजगृहातील एक युनिट वगळता इतर सर्व टप्प्यांतील वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. धरणातील पाण्याचा खडखडाट पाहता सध्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाला दमदार पावसाची प्रतीक्षा असून, सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

१०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असलेले कोयना धरण सिंचनाबरोबरच वीजनिर्मितीमुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ठरले आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांची तहानदेखील कोयनेच्या पाण्यावर भागवली जाते. कोयना धरण भरले की राज्याची चिंता मिटते. मात्र, गेल्या वर्षभरात सिंचन, अखंडित वीजनिर्मिती आणि पिण्याच्या पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाल्याने धरणातील पाणीसाठा तळाला पोहोचला आहे. नवजा येथील जलमापन मनोऱ्याचाही काही भाग उघडा पडला आहे.

मान्सून आणखी लांबणीवर पडल्यास सिंचनाबरोबरच वीजनिर्मितीचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. परिणामी, नजीकच्या काळात भारनियमनाच्या समस्येचीही भीती व्यक्त केली जात असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पावसासह कोयना धरणाकडे लागले आहे. सध्या पायथा वीजगृहातील एकाच युनिटद्वारे वीजनिर्मिती सुरू असून, त्यातून १ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू ठेवण्यात आला आहे. पाण्याअभावी तिसरा आणि चौथा टप्प्यातील वीजनिर्मिती बंद ठेवण्याचा निर्णय कोयना व्यवस्थापनाने घेतला आहे.

पाण्याची पातळी ६२२.०७१ मीटर

कृष्णा नदी पाणीवाटप लवादानुसार १ जून ते ३१ मे हा कालावधी कोयना धरणाचे जलवर्ष म्हणून ओळखला जातो. वर्षभरातील पाऊस आणि पाणीसाठ्यावर सिंचन तसेच वीजनिर्मिती अवलंबून असते. यंदा मात्र धरणातील पाणीसाठ्याने चिंताजनक तळ गाठला आहे. १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणात १४.४८ टीएमसी (१३.७६ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. त्यापैकी ५ टीएमसी मृत पाणीसाठा वजा जाता केवळ ९.३६ टीएमसी (९.३४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणातील पाण्याची पातळी ६२२.०७१ मीटर (२०४०.११ फूट) इतकी नोंदविण्यात आली आहे.

पावसाची प्रतीक्षा

येत्या काही दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली नाही, तर सिंचनाबरोबरच वीजनिर्मितीअभावी भारनियमनाचे नवीन संकट उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज जलाशयासह बळीराजालाही आगामी खरीप हंगामातील पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

IAF AN-32 Aircraft Crash : लँडिंगदरम्यान अनर्थ! जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, VIDEO समोर

... म्हणून तक्रार करत नाही; पारंपरिक समाजात लैंगिक गुन्ह्यांविरोधात कुटुंब कचरतात - न्यायालय

"प्लिज मला एक संधी द्या, चांगला माणूस बनून दाखवेन"; ३७० रुपयांच्या बिर्याणी वादावर प्रणित मोरेची जाहीर माफी, VIDEO

विद्यार्थ्यांना मिळणार ST चे डिजिटल ‘रुपे’ कार्ड; सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना, विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रियेला गती

ठाण्यात अनधिकृत ३७ शाळांविरोधात गुन्हे दाखल; ५८ शाळांची यादी जाहीर, दिवा परिसरात सर्वाधिक शाळा