"श्यामभाऊ मोठ्या भावासारखे"; चापट मारल्याच्या व्हिडीओवर प्रतिभा धानोरकरांची पहिली प्रतिक्रिया (X - व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
महाराष्ट्र

"श्यामभाऊ मोठ्या भावासारखे"; चापट मारल्याच्या व्हिडीओवर प्रतिभा धानोरकरांची पहिली प्रतिक्रिया

या प्रवासादरम्यान श्यामकुमार बर्वे नवीन कपडे घालून आले होते. त्यामुळे इतर खासदारांनी त्यांच्या लग्नाविषयी गंमतीने विचारलं...

किशोरी घायवट-उबाळे

नागपूर : काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचा बसमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये बर्वे हे धानोरकर यांच्या गालावर हळुवारपणे मारताना दिसत असल्याने त्यांनी महिला खासदाराला चापट मारल्याचे दावे करण्यात आले. या प्रकारावर आता प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, बर्वे हे आपल्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, बर्वे यांच्याविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेबाबत वेगवेगळे दावे केले जात होते. मात्र, व्हिडीओचा चुकीचा अर्थ लावला जात असून, प्रत्यक्षात कोणताही आक्षेपार्ह प्रकार घडला नसल्याचे धानोरकर यांनी सांगितले. अशा प्रकारे वृत्त प्रसारित केल्याने महिला खासदाराची प्रतिमा विनाकारण मलिन होत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

बसमध्ये नेमकं काय घडलं? प्रतिभा धानोरकरांनी सांगितला घटनाक्रम

घटनेबाबत माहिती देताना धानोरकर यांनी सांगितले की, काँग्रेसचे खासदार दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथून रामलीला मैदानाकडे बसने एकत्र प्रवास करत होते. त्यावेळी खासदार वर्षा गायकवाड त्यांच्या शेजारी, तर खासदार शोभा बच्छाव पुढील आसनावर बसल्या होत्या. झारखंड आणि राजस्थानमधील काही खासदारही त्यांच्यासोबत होते.

या प्रवासादरम्यान श्यामकुमार बर्वे नवीन कपडे घालून आले होते. त्यामुळे इतर खासदारांनी त्यांच्या लग्नाविषयी गंमतीने विचारलं. वर्षा गायकवाड यांनीही त्यांच्या वयावरून त्यांची चेष्टा केली. यानंतर बसमध्ये हलकीफुलकी थट्टामस्करी सुरू झाली. त्यात बर्वेही सहभागी झाले.

गंमतीने उत्तर देताना बर्वे यांनी आपला मुलगा २० ते २२ वर्षांचा असल्याचे सांगितले. मात्र, स्वतःचे वय अजून ३० वर्षेही झालेले नाही आणि आपले लग्नही व्हायचे आहे, असे त्यांनी विनोदाने म्हटले. याच गप्पांदरम्यान बर्वे यांनी धानोरकर यांच्या गालाला स्पर्श केला. वर्षा गायकवाड यांच्यासोबतही त्यांनी अशाच प्रकारे गंमत केल्याचे धानोरकर यांनी स्पष्ट केले.

निनावी ई-मेलद्वारे तक्रार केल्याचा दावा

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आल्याचा दावा असलेल्या एका कथित तक्रारीचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर समोर आले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना ही तक्रार पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 'नागपूर काँग्रेस कार्यकर्ता' या नावाच्या अज्ञात ई-मेल खात्यावरून ही तक्रार करण्यात आल्याचा दावा आहे.

मात्र, या तक्रारीच्या विश्वासार्हतेवर धानोरकर यांनी प्रश्न उपस्थित केले. तक्रार नेमकी कोणी केली, याची माहिती नसताना आणि तक्रारदाराची ओळख स्पष्ट नसताना अशा आरोपांना प्रसिद्धी देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. या माध्यमातून आपली, श्यामकुमार बर्वे आणि वर्षा गायकवाड यांची बदनामी करण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

'बदनामी करण्याचा प्रयत्न'; श्यामकुमार बर्वे यांचीही प्रतिक्रिया

दरम्यान, या प्रकरणावर खासदार श्यामकुमार बर्वे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेबाबत प्रतिभा धानोरकर यांनाच प्रश्न विचारायला हवेत. आमचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. विनाकारण हा विषय उकरून काढून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे बर्वे यांनी म्हटले.

तसेच, या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचेही बर्वे यांनी स्पष्ट केले.

'आमचे नाते कुटुंबातील सदस्यांसारखे'

काँग्रेसचे खासदार एकाच इमारतीत राहत असल्याने त्यांच्यात जवळचे वैयक्तिक संबंध आहेत. अनेकदा ते एकत्र जेवतात आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे एकमेकांशी संवाद साधतात, असे धानोरकर यांनी सांगितले. त्यामुळे एका खेळीमेळीच्या प्रसंगाचा चुकीचा अर्थ काढू नये, असे आवाहन त्यांनी केले.

दिल्लीतील काँग्रेसच्या आंदोलनात अनेक महत्त्वाचे राजकीय मुद्दे असताना त्याकडे दुर्लक्ष करून या व्हिडीओचीच चर्चा का केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, व्हायरल व्हिडीओ आणि त्यावरून सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ

Thane Accident : घोडबंदर मार्गावर टेम्पोला धडकून केमिकल टँकर उलटला; एक जखमी, दोन्ही दिशांची वाहतूक विस्कळीत

राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा स्फोट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रारीचा सूर, देवगिरीवर आमदारांची बैठक

अनिल अंबानी समूहाप्रकरणी ED ची माेठी कारवाई; ५१० कोटींच्या संपत्तीवर टाच

Mumbai : नुकसानभरपाई मालक व भाडेकरूमध्ये समान वाटून घ्या! सिद्धिविनायक मंदिर जमीन भरपाईप्रकरणी आदेश