विजय वडेट्टीवार  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

प्रवीण गायकवाड मारहाणीचे सभागृहात पडसाद : हत्या करण्याचा डाव होता, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना गाडीतून खेचून बाहेर काढले आणि तोंडाला काळे फासण्यात आले. यावेळी त्यांची हत्या करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत केला.

Swapnil S

मुंबई : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना गाडीतून खेचून बाहेर काढले आणि तोंडाला काळे फासण्यात आले. यावेळी त्यांची हत्या करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत केला. प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकण्याची घटना घडली, त्यावेळी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी फिर्याद घेतली असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात सांगितले. ९७ सूचनेन्वये विधी मंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळ फासण्यात आले. खरं तर त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता. गायकवाड यांना झालेल्या मारहाणीनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत ५७च्या सूचनेवर लावून धरली.‌ गायकवाड यांना कुठल्या कारणामुळे मारहाण झाली? राज्यात अनेकांनी आपले नाव संभाजी ठेवले आहे. त्यांना मारहाण झाली का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

“संभाजी ब्रिगेड संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत असून संभाजी महाराजांच्या विचारांवर काम करणारी संस्था आहे. प्रवीण गायकवाड यांना गाडीतून खेचून बाहेर काढले, खाली पाडले आणि मारहाण केली. गायकवाड यांचा जीव घेण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर हल्ला केला होता. गायकवाड यांना मारहाण केली, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून पिस्तूल बाळगली म्हणून गुन्हा दाखल आहे. सख्खा चुलत भावाच्या खुनात तो जेलमध्ये बंद होता. गायकवाड यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होता, त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता.

सखोल चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल - मुख्यमंत्री

या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोपी संभाजी नाव का ठेवले, छत्रपती नाव का नाही ठेवले, यावरून वाद झाला आणि शाई फेकली. त्यावेळी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. फिर्याद द्या, म्हणून पोलिसांनी विनंती केली, मात्र त्यांनी फिर्याद दिली नाही. अखेर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणात जी काही कलम लावावी लागतील, ती लावली जातील आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला आश्वासित केले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश