महाराष्ट्र

संपूर्ण जगाचे लक्ष वाढवण बंदराकडे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, ७६ हजार कोटी रुपये खर्च

Swapnil S

वाढवण : जगातील फार कमी बंदरे वाढवण बंदराच्या २० मीटर खोलीशी बरोबरी करू शकतात. संपूर्ण जगाचे लक्ष आज वाढवण बंदराकडे लागले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हे बंदर रेल्वे आणि महामार्ग कनेक्टिव्हिटीमुळे संपूर्ण क्षेत्राचे आर्थिक परिदृश्य बदलेल, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पालघरमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हा प्रकल्प ७६ हजार कोटी रुपये रुपयांचा आहे. तसेच १५६० कोटी रुपयांच्या २१८ मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यांचा समावेश आहे. मोदी यांनी सुमारे ३६० कोटी रुपये खर्चाच्या वेसल कम्युनिकेशन आणि सपोर्ट सिस्टीमचे राष्ट्रार्पण केले.

महाराष्ट्राच्या इतिहासकालीन सागरी व्यापाराचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, किनारपट्टीच्या संपर्कात असल्याने या राज्यात विकासाकरिता आवश्यक असलेली क्षमता आणि संसाधने आहेत. “वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असेल आणि जगातील सर्वात मोठे खोल पाण्यातील बंदर ठरेल. महाराष्ट्र आणि भारताच्या औद्योगिक विकासाचे आणि व्यापाराचे ते केंद्र बनेल,” असे ते म्हणाले.

समर्पित वेस्टर्न फ्रेट कॉरिडॉर आणि दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या जवळ असल्यामुळे याद्वारे नवीन व्यवसाय आणि गोदामांसाठी संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “वर्षभर या प्रदेशातून मालवाहतूक होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना फायदा होईल”, असेही ते म्हणाले.

‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ कार्यक्रमांतून महाराष्ट्राने मिळवलेल्या यशावर प्रकाश टाकत पंतप्रधान मोदी म्हणाले, “महाराष्ट्राच्या विकासाला माझे सर्वाधिक प्राधान्य आहे. भारताच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्वाची असल्याचे नमूद करताना विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला.

वाढवण बंदर प्रकल्प जवळपास ६० वर्षे रखडल्याबद्दल मागील सरकारच्या प्रयत्नांवर रोष व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, भारताला सागरी व्यापारासाठी नवीन आणि प्रगत बंदराची आवश्यकता होती, परंतु या दिशेने काम २०१६ पर्यंत सुरू झाले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच या प्रकल्पावर गांभीर्याने विचार झाला आणि २०२० पर्यंत पालघरमध्ये बंदर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी मासेमारी बंदरांचा विकास, सुधारणा आणि आधुनिकीकरण, फिश लँडिंग सेंटर आणि फिश मार्केटच्या बांधकामासह महत्त्वाच्या मत्स्यपालन पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचीही पायाभरणी केली. त्यांनी मच्छिमार लाभार्थ्यांना ट्रान्सपॉन्डर सेट आणि किसान क्रेडिट कार्डचे वितरण केले.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत