Pune : नशेच्या विळख्याला आता सरकारी घेराव! अमली पदार्थांविरोधात १९ सरकारी विभाग एकत्र येणार! (Photo-X)
महाराष्ट्र

Pune : नशेच्या विळख्याला आता सरकारी घेराव! अमली पदार्थांविरोधात १९ सरकारी विभाग एकत्र येणार!

राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने व्यापक ‘ड्रग फ्री’ अभियान राबविण्यात येणार आहे.

Swapnil S

पुणे : राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने व्यापक ‘ड्रग फ्री’ अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी शासनाचे तब्बल १९ विभाग एकत्रितपणे काम करणार असून, अमली पदार्थांची खरेदी-विक्री रोखण्यासोबतच समाजात जनजागृती निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि अत्याधुनिक पोलीस साधनसामग्रीच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे आदी उपस्थित होते.

अमली पदार्थांच्या वाढत्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही विदेशी शक्ती भारताची प्रगती रोखण्याच्या उद्देशाने देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. पंजाबमध्ये अमली पदार्थांचे जाळे पसरवून तेथील परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न झाला, त्याच धर्तीवर इतर राज्यांमध्येही असे प्रयत्न होत आहेत.

सध्या सिंथेटिक ड्रग्जचा वापर वाढत असून, तरुण व्यसनाधीन होत आहेत. त्यातून गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या नसून सामाजिक लढाई आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या दैनंदिन वर्तनावर आणि हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

व्यसनाधीन तरुणांवर केवळ कायदेशीर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. त्यांना वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन देऊन व्यसनमुक्त करणे तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेही सरकारचे उद्दिष्ट असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पुढील १५ वर्षांत पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या पुण्यापेक्षाही अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील लोकसंख्या आणि सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन आतापासूनच सूक्ष्म नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पोलिसांचे आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा वापर

पिंपरी-चिंचवडमधील वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरण लक्षात घेऊन आठ वर्षांपूर्वी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले. आता पोलीस यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. आपत्कालीन मदतीसाठीच्या ‘डायल ११२’ प्रणालीअंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलिसांचा प्रतिसाद वेळ देशात अव्वल असून, पोलीस अवघ्या तीन मिनिटांत घटनास्थळी पोहोचत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान आणि डिजिटल नोंदींमुळे गुन्ह्यांचा तपास अधिक गतिमान झाला असून दोषसिद्धीचे प्रमाणही वाढले आहे. ‘तपास सारथी’ या आधुनिक प्रणालीमुळे पुराव्यांची साखळी अधिक मजबूत होईल. तसेच पोलिसांच्या अंगावरील ‘बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यां’मुळे कामकाजात पारदर्शकता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमली पदार्थ तस्करांवर कठोर कारवाई

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासातील हा दिवस सुवर्णक्षण असल्याचे सांगितले. शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. शहराच्या विकासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ

राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा स्फोट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रारीचा सूर, देवगिरीवर आमदारांची बैठक

अनिल अंबानी समूहाप्रकरणी ED ची माेठी कारवाई; ५१० कोटींच्या संपत्तीवर टाच

Mumbai : नुकसानभरपाई मालक व भाडेकरूमध्ये समान वाटून घ्या! सिद्धिविनायक मंदिर जमीन भरपाईप्रकरणी आदेश

...तर निवडणुका घ्यायच्याच कशाला? 'गोकुळ' अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटलांचा संताप