पुण्यात दोन CA विरोधात गुन्हा; 'शेल'च्या माध्यमातून ४,४२७ कोटींची करचुकवेगिरी  
महाराष्ट्र

पुण्यात दोन CA विरोधात गुन्हा; 'शेल'च्या माध्यमातून ४,४२७ कोटींची करचुकवेगिरी

पुण्यामध्ये शेल कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल ४,४२७ कोटी ९२ लाख रुपयांहून अधिक रकमेची करचुकवेगिरी करून ती रक्कम परदेशात पाठवल्याचा एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारचा आयकर चुकवल्याचा आरोप ठेवत पुण्यातील दोन चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

पुणे : पुण्यामध्ये शेल कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल ४,४२७ कोटी ९२ लाख रुपयांहून अधिक रकमेची करचुकवेगिरी करून ती रक्कम परदेशात पाठवल्याचा एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारचा आयकर चुकवल्याचा आरोप ठेवत पुण्यातील दोन चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी बनावट कागदपत्रे आणि ऑडिट अहवालांचा वापर करून हा कोट्यवधी रुपयांचा आयकर घोटाळा घडवून आणल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अंकुश कुमार सुरेशचंद बगरेचा (३४, रा.आचलनगर, कोंढवा) आणि मोहित शिवकुमार तोडी (३३, रा. कोंढवा बुद्रुक) या दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निगडी प्राधिकरणातील रहिवासी तन्मयी सुहास देसाई यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

देसाई यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अंकुश बगरेचा आणि मोहित तोडी यांनी त्यांच्या ‘एम.एस.ओडी अँड असोसिएट्स’ या फर्मच्या माध्यमातून इतर साथीदारांच्या मदतीने हा संपूर्ण घोटाळा घडवून आणला. शेल कंपन्यांच्या व्यवहारांशी संबंधित मूळ व अधिकृत कागदपत्रे सादर न करता किंवा त्यांची योग्य तपासणी न करता, त्यांनी परदेशात पैसे पाठवण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म १५ सीबीचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यानंतर ही बनावट प्रमाणपत्रे खरी असल्याचे भासवून आयकर विभागासमोर सादर करण्यात आली.

पोलीसांकडून सखोल तपास सुरू

या प्रकरणाचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत. परदेशात पाठवण्यात आलेल्या या रकमेचा मूळ स्रोत काय होता, या व्यवहारांसाठी कोणती बँक खाती वापरली गेली, पैसा नक्की कोणत्या देशांमध्ये पाठवण्यात आला, तसेच या तीन कंपन्यांच्या संचालकांची यात नेमकी काय भूमिका होती, या सर्व बाबींचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.

कंपन्यांना फायदा मिळवून दिल्याचा आरोप

तसेच, फॉर्म १५सीबी तयार करण्याचा अधिकार नसतानाही आरोपींनी तो तयार करून आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सन २०२२ ते २०२६ या कालावधीत हा कथित गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या कालावधीत संबंधित तीन शेल कंपन्यांच्या माध्यमातून एकूण ४,४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये परदेशात पाठवण्यात आले. या प्रचंड रकमेवर केंद्र सरकारला मिळणारा कर चुकवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळाचा ३ टप्प्यांत आढावा; राज्य सरकारकडून मदत; उपाययोजनांना सुरुवात, ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

प्राध्यापकावर कारवाई; IIT मुंबईतील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी संस्थेने मागितली माफी; गेल्या २० वर्षांत १६० विद्यार्थ्यांची आत्महत्या

ठाण्याला पावसाने झोडपले; राज्यातील अनेक भागांना यलो अलर्ट

Mumbai : एक हजार झोपडीधारकांना नोटिसा; १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई अटळ, आकडा वाढणार