नागपूर : पुणे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत असून वाढती लोकसंख्या, नागरीकरण लक्षात घेता शहराचा आराखडा तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पुणे महानगर क्षेत्रात २२० प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे हाती घेतली असून त्यासाठी ३२ हजार ५२३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पुणे महानगर नियोजन समितीच्या पाचव्या सभेचे आयोजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रिपरिषद सभागृहात करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
पुण्यासाठी निर्धारित कालमर्यादेत ‘स्ट्रक्चर प्लॅन’ तयार करताना भविष्यातील वाढणारी लोकसंख्या, नागरीकरण यांचा विचार करण्यात यावा. विकासाचे नियोजन करताना विविध प्राधिकरणांकडे काही क्षेत्रांच्या विकासाची जबाबदारी न देता संपूर्ण क्षेत्राचा विकास एकाच प्राधिकरणाने करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
पुणे महापालिकेत ३० जून २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासाचे नियोजन पुणे महापालिकेने करावे. पुणे शहरात माण-म्हाळुंगे टाऊनशिप प्लॅनिंग योजनेचे काम गतीने पूर्ण करावे. शहरामध्ये एकीकृत टाऊन प्लॅनिंगच्या १५ योजनांवर काम सुरू असून यात कालमर्यादा निश्चित करावी. वेळेत योजना पूर्ण झाल्यास त्याचा लाभ सर्वांना होतो, त्यामुळे कुठेही विलंब न लावता या योजनांची कामे पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पुण्यातील सुरू असलेली विकासकामे
पुणे महानगरात ५८९ किमी लांबीच्या रस्त्याची १२७ कामे, शहरांतर्गत ८३ किलोमीटर लांबीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प, पुणे शहराअंतर्गत विकास केंद्र, औद्योगिक क्षेत्र, विमानतळ जोडणीसाठी रस्त्यांची कामे, पूल आणि उड्डाणपुलाची तीन कामे, गृहनिर्माण प्रकल्पांची तीन कामे, पाणीपुरवठा योजनांची चार कामे सुरू असून वाघोली पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे.
नद्यांचे पुनरुज्जीवन
पवना, इंद्रायणी, मुळा व मुठा नद्यांच्या पुनरुज्जीवनाची तीन कामे, चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी १७ कामे, १० पर्यटन विकास केंद्रांची कामे, स्कायवॉकचे एक काम, मल्टी मॉडेल हब प्रकल्पाची पाच कामे लवकरच सुरू होणार आहेत.
येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग
येरवडा ते कात्रजदरम्यान २० किमीचा भुयारी मार्ग प्रस्तावित केला आहे. या महामार्गाच्या व्यवहार्यता पडताळणीचे काम सुरू असून यासाठी अंदाजित ७ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
मलनि:सारणाच्या १२०९.०८ कोटींच्या कामांना मान्यता
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनि:सारण योजनांअंतर्गत २७ गावांमधील १२०९.०८ कोटींच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे संबंधित गावातील ३९ लाख ४२ हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे. अग्निशमन सेवा शुल्कापोटी ३०० कोटी रुपयांच्या निधीचा उपयोग पुणे महानगरात अग्निप्रतिबंधक आराखड्यानुसार विविध उपाययोजनांसाठी करण्यात येणार आहे.