पुणे: पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (National Chemical Laboratory-NCL) एका वरिष्ठ शास्त्रज्ञाला सायबर चोरट्यांनी 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढून तब्बल ७८ लाख रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणातील पीडित शास्त्रज्ञ हे ५० वर्षांचे असून, काही दिवसांपूर्वी त्यांना एका क्रमांकावरून फोन येत होते. अखेर त्यांनी फोन उचलला असता, समोरच्या व्यक्तीने आपण बेंगळुरूच्या अशोक नगर पोलीस ठाण्यातील 'इन्स्पेक्टर संदीप दिवाण' असल्याचे सांगितले. शास्त्रज्ञांच्या ओळखपत्राचा वापर करून मनी लाँडरिंगसाठी काही बँक खाती उघडण्यात आली आहेत आणि हे प्रकरण आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले आहे, अशी बतावणी या भामट्याने केली.
व्हिडिओ कॉलवर IPS अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक
व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केला असता स्क्रीनवर पोलीस गणवेशातील एक महिला अधिकृत केबिनमध्ये बसलेली दिसत होती. तिने आपली ओळख बिहार कॅडरच्या आयपीएस अधिकारी नवजोत सिमी अशी करून दिली. वास्तविक, आयपीएस नवजोत सिमी यांचे इन्स्टाग्रामवर प्रचंड फॉलोअर्स आहेत, त्याचाच फायदा घेऊन त्यांच्या नावाचा गैरवापर भामट्यांनी केला. या महिलेने शास्त्रज्ञाला सांगितले की त्यांना 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आले आहे आणि लवकरच त्यांना घरातून अटक केली जाईल, असे सांगत ७५ लाखांची मागणी केली. इतके पैसे नाहीत, अशी अनेकदा विणवणी करूनही त्यांना सात दिवसांत पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. घाबरून त्यांनी सुरूवातीला ७ लाख रुपये पाठवले. त्यानंतर पुढील काही दिवसांनी त्यांनी बँकेकडून 'इन्स्टंट लोन' (तात्काळ कर्ज) आणि सोन्यावर तारण कर्ज घेतले. इतकंच काय तर, आपल्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडूनही पैसे उसने घेतले; मात्र, त्यामागील नेमके कारण त्यांनी कोणालाही सांगितले नाही. अशाचप्रकारे धमकावून आरोपींनी त्यांच्याकडून तब्बल ७८ लाख रुपये उकळले. काही दिवसांनी त्यांनी पुन्हा कथित 'सिमी'च्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर कोणीच प्रतिसाद देत नव्हते, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.