गणेशोत्सवात प्लाझ्मा, लेझर वापराला बंदी; पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

गणेशोत्सवात प्लाझ्मा, लेझर वापराला बंदी; पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्त्वपूर्ण निर्णय

आगामी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा आणि लेझर किरणांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पूर्णपणे बंदी घातली आहे. ध्वनी आणि प्रकाश प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी स्पष्ट केले आहे.

Swapnil S

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये प्लाझ्मा आणि लेझर किरणांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पूर्णपणे बंदी घातली आहे. ध्वनी आणि प्रकाश प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी स्पष्ट केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळावर पोलिसांकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात पाच हजारांहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आणि सुमारे १ लाख ७० हजार घरगुती गणपतींची स्थापना केली जाणार आहे. या सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी नुकतीच बैठक पार पडली.

ज्यात पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार प्रामुख्याने उपस्थित होते. या तयारीदरम्यान पोलिसांनी १५० प्रमुख गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या स्थानिक अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

या बैठकांमध्ये मंडळांच्या प्रतिनिधींनी विसर्जन मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, सुरक्षित व खंडित न होणारा वीजपुरवठा, विसर्जन घाटावरील नदीपात्रातील पाण्याची वाढती पातळी आदी समस्या मांडल्या. या सर्व अडचणींवर संबंधित शासकीय विभागांशी तत्काळ समन्वय साधून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. पोलिसांकडून सर्व गणेश मंडळांना अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मिरवणुकीतील डीजेच्या वापरावर पोलिसांनी विशेष मर्यादा घातली आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण नियमांचे आणि निर्धारित करण्यात आलेल्या मयदिच्या अधीन राहूनच आवाज ठेवावा लागेल. नियम धाब्यावर बसवून गोंगाट करणाऱ्या आणि मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांच्या विरोधात कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील.

अमली पदार्थविरोधी अभियान राबवा

जिल्ह्यातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून वाचवण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक गणेश मंडळाला 'से नो टू ड्रग्ज' अभियानात सहभागी होण्याचे आणि आपापल्या परिसरात जनजागृतीपर प्रदर्शन आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर सतर्कता आणि जागृती निर्माण करण्यासाठी विशेष पोस्टर्स व इतर माध्यमांचा वापर केला जाणार आहे.

डीजे, डॉल्बीच्या अतिरेकी वापराला विरोध; पुण्यात आज प्रबोधन सभा

आपला विरोध कोणत्याही सण-उत्सवाला, गणेशोत्सव मंडळांना किंवा कार्यकर्त्यांना नसून, केवळ उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या डीजे आणि डॉल्बीच्या अतिरेकी वापराला आहे, अशी स्पष्ट भूमिका पुणेकरांनी घेतली असून, या पार्श्वभूमीवर डीजे, प्लाझ्मा आणि लेझर यांसारख्या आरोग्यविघातक गोष्टींवर संपूर्ण बंदी घालण्याच्या मागणीसाठी आणि डीजेमुक्त उत्सवाचे प्रबोधन करण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजता डेक्कन येथील गुडलक चौकात एका विशेष प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजकांनी स्पष्ट केले की, हे कोणतेही आंदोलन किंवा मोर्चा नसून सुजाण नागरिकांची शांततापूर्ण प्रबोधन सभा आहे. या सभेचा उद्देश प्रशासनाविरुद्ध आवाज उठवणे किंवा गणेशोत्सव मंडळांशी संघर्ष करणे असा नसून, आपण सर्वजण गणपतीच्या बाजूचे आणि बुद्धीच्या देवतेच्या मार्गावर चालणारे आहोत या भावनेतून एकत्र येणे हा आहे. या सभेसाठी डेक्कन पोलिसांची अधिकृत परवानगी मिळाली असून, प्रशासनाचे आणि पोलिसांचे पूर्ण सहकार्य लाभले आहे. पुण्यातील सुसंस्कृत आणि सुजाण नागरिकांना आपल्या अत्यंत प्रामाणिक व विधायक मागणीसाठी एकत्र येण्याची ही एक महत्त्वाची संधी असल्याचे निवेदनात म्हटले गेले आहे.

पुण्यात 'डीजेमुक्त गणेशोत्सवा'ला पाठिंबा; पुनीत बालन यांची माहिती

दहीहंडी आणि गणेशोत्सवात डीजे तसेच मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमच्या वापरावरून पुण्यात चर्चा सुरू असतानाच, यंदा शहरातील २०० हून अधिक गणेश मंडळांनी 'डीजेमुक्त गणेशोत्सव' साजरा करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना बालन म्हणाले की, पुण्याच्या गणेशोत्सवाची पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळख जपणे, तसेच ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

दहीहंडी आणि गणेशोत्सवात डीजे व ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत पुण्यात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काही गणेश मंडळे आणि उत्सवाशी संबंधित घटकांकडून निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत असताना, पुणे पोलिसांनी निर्धारित ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या साउंड सिस्टीमना परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

टॅक्सी, रिक्षाचालकांची याचिका निकाली; मराठी शिकण्यासाठी सरकारने वर्षभराची मुदत दिल्याचे न्यायालयाचे मत

Mumbai : स्थानकांवर थुंकल्यास हजार रुपये दंड; न भरल्यास प्रवाशाला न्यायालयात उभे करणार

मुद्रांक कायद्यातील मुदतीबाबत तिढा; प्रकरण मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे वर्ग

'समृद्धी' महामार्गावर दरोडा! गाडी थांबवून वकिलाला लुटले; कुटुंबाला मारहाण करत १८ लाखांचे सोन्याचे दागिने, रोकड पळवली

यंदाची यूएस ओपन जिंकणार कोण? हंगामातील अखेरची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून