पुणे : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून बांधकाम व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल याला सुमारे ४०० फूट खोल दरीत ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सायबर फॉरेन्सिक तपासाच्या आधारे महत्त्वपूर्ण डिजिटल पुरावे मिळवले आहेत. या पुराव्यांच्या आधारे घटनेनंतर तब्बल ७९ दिवसांनी रितेश हंगे या आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान केतनची होणारी पत्नी सिया गोयल तसेच संशयित चेतन आणि रितेश यांच्यातील ऑडिओ संभाषण आणि चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले आहे. घटनास्थळ तसेच संशयितांकडून मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट, पेनड्राइव्ह आणि हार्डडिस्क जप्त करून ते सायबर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
फॉरेन्सिक तज्ज्ञांनी आठ हार्डडिस्कचे सखोल विश्लेषण करून मोठ्या प्रमाणात डेटा पुनर्प्राप्त केला. या डेटाच्या आधारे चेतन आणि रितेश यांच्यातील संवाद, चॅटिंग तसेच अन्य तांत्रिक पुरावे समोर आले. हे पुरावे रितेशच्या अटकेसाठी निर्णायक ठरल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.